हापूस आंब्याच्या प्रक्रिया पदार्थांचा दर्जा राखाल तर त्याला देशीच नव्हे, तर परदेशी बाजारातही दर अधिक मिळतो. अमेरिकेत यंदा हापूस आंब्याला तुलनेत दुप्पट मागणी होती. आंबा पल्पलाही मागणी वाढत असून, दरही चार डॉलरने अधिक मिळत आहे. याला प्रक्रिया उद्योजक आनंद देसाई यांनीही दुजोरा दिला आहे. वातावरणातील बदलांमुळे हापूसचे उत्पादन यंदा तुलनेत अत्यंत कमी होते. त्यामुळे पुरेसा हापूस आंबा खवय्यांना खायला मिळालेला नाही; परंतु शेवटच्या टप्प्यात उत्पादन मिळाले. आवक कमी असल्यामुळे हापूसचे दरही अधिक होते. यंदा उशिरा दाखल झालेला मान्सून शेवटच्या टप्प्यात आंबा बागायतदारांच्या पथ्थ्यावर पडला.
झाडावरील आंबा काढण्यासाठी पुरेसा कालावधी मिळाल्याने प्रक्रियेसाठी आंबा उपलब्ध झाला. बाजारातही दर स्थिर राहिल्यामुळे त्याचा फायदा उठवता आला. परजिल्ह्यातील खवय्यांना पाहिजे तेवढा आंबा खायला मिळालेला नसल्याने पल्पचे दर वाढूनही मागणी कमी झाली नाही. यंदा अमेरिकेत हापूसची अधिक निर्यात झाली… त्याप्रमाणेच हापूसच्या पल्पलाही मोठी मागणी असल्याचे प्रक्रियादार आंनद देसाई यांनी सांगितले. दर्जेदार पल्पला अमेरिकेत ८५० ग्रॅमच्या डब्याला ५. ९९ डॉलर दर मिळत होता. यावर्षी हाच दर ९.९९ डॉलर मिळाला आहे. चार डॉलर अधिक दर मिळत असून भारतीय रुपयानुसार ३२८ रुपये अधिक मिळाले आहेत.
पाऊस लांबला, पल्पला मागणी वाढली – जून पूर्णतः उन्हाचा गेला. त्यामुळे नागरिकांकडून शीतपेयांची मागणी वाढलेली होती. जूनमध्ये विवाहांचे मुहूर्त अधिक असल्याने यात जेवणात पल्पचा वापर अधिक झाला. त्याबरोबरच आईस्क्रीम, ज्यूस यासाठी आंबा पल्पचा वापर अधिक झाला होता. त्यामुळे दर वधारूनही जूनमध्ये गत वर्षीच्या तुलनेत अधिक पल्प विक्रीला गेल्याचे आनंद देसाई यांनी सांगितले.
भारतात ७० रुपये अधिक दर – हंगामात सुरुवातीला कॅनिंगला आंबा नव्हता. साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डागी आंबा कॅनिंगला मिळू लागला. किलोचा दर ७० ते ८०, रुपये किलो मिळाला. हा दर शेवटपर्यंत टिकून होता. मेच्या पहिल्या पंधरवड्यात, दर किलोला ५० रुपयांपर्यंत होता. तो पुन्हा ६५ ते ७० रुपये वधारला. यंदा कॅनिंगचा सरासरी दर ६० ते ६२ रुपये मिळाला. दरवर्षी तो सरासरी ३५ रुपये असतो. वाढीव दरामुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याने पल्पसह आंब्यावरील प्रक्रिया पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. तीन किलोच्या डब्याचा ८५० रुपये दर आहे. पूर्वी हा डबा ६५०. रुपये होता.