मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात अवजड वाहतूक व एसटी यांना बंदी घातलेली असतानाही पोलादपूर बाजूकडून खेड दिशेने जाण्यासाठी एसटी चालकाने बस कशेडी बोगदामार्गे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी झाली, अशी माहिती या मार्गावर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. कशेडी बोगदा अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तरीही अनेकजण वाहने कशेडी बोगदामार्गे मार्गस्थ करत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाने एसटी बस बोगद्यातून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेले अडथळे आणि लहान वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी झाली. बोगद्यातून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे हे माहिती असूनसुद्धा एसटी चालकाने बस या मार्गावरून नेली. याची गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कशेडी बोगद्यातून वाहतूककोंडी झाली होती.
तेव्हा नेमके शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम हे खेड बाजूकडून मुंबईकडे जात होते. वाहतूककोंडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. एसटी बसचालकाने या मार्गावर बस आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाहतूककोंडी झाल्याचे समजताच कदम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. याबाबत त्यांनी गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आहेत.