मी मुख्यमंत्री होईन याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ न देता मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आह. तर एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी कारवाया केल्या, असेही पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना फुटली आहे. मी दापोलीतून तिकीट मागितले होते, पण मला गुहागरमधून निवडणूक लढवायला लावली, आणि मला पाडण्यासाठी काही जणांना कामाला लावले, कारण बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी त्यांना भीती होती, असा आरोप कदमांनी केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बाजूला व्हायला भाग पाडले. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना आयती गादी मिळाली आहे. त्यांनी कधी आपल्या अंगावर केसेस घेतलेल्या नाहीत. ते आयत्या बिळावर नागोबा झालेत. त्यांनी नेहमी मराठी माणसात फूट पाडण्याचे काम केले. आम्ही तर शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत, असे कदमांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतणे संघर्ष काही नवीन नाही. त्यात आता आणखी एका नवीन काका- पुतण्याचा संघर्ष आगामी विधानसभां निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर रामदास कदम यांचे पुत्र व विधानसभा निवडणुकीचे उमेदवार योगेश कदम यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला अनिकेत कदम यांना दिला आहे. आ. योगेश कदम म्हणाले, अनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटते. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतो.