रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीमध्ये ४२६ ग्रामपंचायतींवर महिलांचे राज्य राहणार आहे. उर्वरित ४२१ जागा खुल्या ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पक्षांना महिला उमेदवार शोधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सरपंचपदाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढले. त्यामध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती १८, अनुसूचित जाती स्त्री १८, अनुसूचित जमाती स्त्री ६, अनुसूचित जमाती ५, नागरिकांचा मागास प्रवर्ग ११३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ११६, तर सर्वसाधारण स्त्री २८६ आणि सर्वसाधारण २८५ जागा सरपंचपदासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तालुकास्तरावर झालेल्या या प्रक्रियेबाबत सर्वच लोकप्रतिनिधींमध्ये उत्सुकता होती. महिला आरक्षण पडलेल्या ठिकाणी अनेक पुरुष उमेदवारांचा हिरमोड झालेला होता.
आरक्षण निश्चित झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी उमेदवारांचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरपंचपदांची आरक्षणे जाहीर झाल्यामुळे भविष्यात सर्वच पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी वेळ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना तळागाळात पोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर भाजपकडूनही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. आरक्षण जाहीर झाल्यामुळे गावागावांतील इच्छुक आपापल्या परीने उमेदवारीसाठी फिल्डींग लावणार आहेत.