बांधकाम सुरू असलेला रस्ता पूर्ण होण्याआधीच या मार्गावरून बिनधास्तपणे चिरे वाहतूक करणाऱ्या दहा ते बारा अवजड ट्रकना अडवून नागरिकांनी वाहतूक रोखून धरली. हा प्रकार रात्री १० वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यातील आसगे – येथे घडला. नागरिकांशी अरेरावी करणाऱ्या ट्रकचालकांना नागरिकांनी चांगलीच ताकीद दिली. ट्रक अडवून धरल्याने आसगे येथे चिरेवाहू ट्रकांची लांबलचक रांग लागली होती. काहीकाळ झालेल्या बाचाबाचीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते; मात्र नागरिकांनी ट्रकचालकांना समज देऊन सोडून दिले. लांजा तालुका कोल्हापूर जिल्ह्याला जोडलेल्या आसगे-तळवडे-कुरचुंब-साखरपा मार्गावर सहा महिन्यापूर्वी अवजड चिरेवाहू ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या मार्गावरील अवजड चिरे वाहतूक बंद करून वाहतूक पालीमार्गे वळवण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या; मात्र पुन्हा राजरोसपणे सोळाचाकी अवजड ट्रकांतून चिरे वाहतूक सुरू झाल्याने देवधे, आसगे, तळवडे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लांजा तालुक्यातील जांभा चिरा प्रसिद्ध असून, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये जांभा जाऊन पोहचला आहे. त्यामुळे लांजा तालुका जांभा चिऱ्यांच्या खाणी लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गला जोडलेल्या देवधे-आसगे मार्गाचे सध्या रूंदीकरणाचे काम प्रगतीपथाकडे आहे. काम पूर्ण होण्याआधीच या मार्गावरून बिनधास्तपणे चिरेवाहू अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. लांजा-आसगे-तळवडे- कुरचुंब मागनिही जांभा चिरा वाहतूक सुरू आहे. देवधे-आसगे मार्गावरून जांभा चिरा वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांना रात्री १० वाजता देवधे व आसगे येथील नागरिकांनी एकत्र येऊन आसगे येथे तासभर अडवून धरले होते. तालुक्याच्या पश्चिम भागाकडून एकूण बारा अवजड सोळाचाकी ट्रक कोल्हापूरच्या दिशेनें निघाले होते. या मार्गावरून येऊ नये, नय असा सज्जड इशारा या वेळी नागरिकांनी ट्रकचालकांना दिला.
मध्यरात्री पुन्हा तोच प्रकार – मध्यरात्री पुन्हा १ वाजता नागरिकांनी याच मार्गावरून चिरा वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांना अडवून धरले व पुन्हा या मार्गावरून न येण्याची समज दिली. लांजा बाजारपेठ, वाहनांची गर्दी व संबंधित प्रशासनाची नजर चुकवण्यासाठी देवधे-आसगे मार्गावरून दिवसेंदिवस चिरे अवजड वाहतूक वाढली. आहे. यासह अवजड वाहनांमुळे गावरस्ते खराब होत असल्याचा ठपकाही नागरिकांनी ठेवला.
रस्त्यांची दुरवस्था – लांजा-तळवडे-दाभोळे रस्त्याची अवजड वाहनांमुळे आसगे, तळवडे व कुरचुंब या भागांमध्ये दुरवस्था झाली आहे. तळवडे खिंड येथील अवघड वळणावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चिऱ्याची वाहतूक होत आहे. लांजा-आसगे-तळवडे-दाभोळे मार्गावर दिवसभरात कोल्हापूर, कर्नाटक दिशेने जाणारे चिरेवाहू ट्रक धावतात.