HomeRatnagiriसंगमेश्वर तालुक्यात अवैध जंगलतोड; वन विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

संगमेश्वर तालुक्यात अवैध जंगलतोड; वन विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो झाडांची बेकायदेशीर कत्तल

साखरपा, माखजनसह अनेक गावांमध्ये लाकूड माफियांचा हैदोस; अधिकाऱ्यांवर 'तोडपाणी'चा आरोप करत निसर्गप्रेमींचा संताप.

एकीकडे पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवडीच्या मोठ्या योजना राबवत आहे. मात्र, दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात याच्या अगदी उलट आणि धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. संगमेश्वरच्या निसर्गरम्य आणि दुर्गम भागांमध्ये सध्या लाकूड माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, हजारो हिरव्यागार झाडांची बेकायदेशीरपणे सर्रास कत्तल केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक वन विभाग पूर्णपणे डोळेझाक करत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दुर्गम भागात राजरोसपणे कुऱ्हाड मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील अनेक मोठ्या महसुली आणि दुर्गम जंगलांमध्ये ही अवैध वृक्षतोड राजरोसपणे सुरू आहे. विशेषतः साखरपा, निवे, सांगवे, मुचरी, डिंगणी, कढवई आणि माखजन या परिसरात लाकूड माफिया प्रचंड सक्रिय झाले आहेत. मौल्यवान आणि जळाऊ लाकडांची बेसुमार छाटणी करून त्यांचे मोठे साठे थेट मुख्य रस्त्यांपासून दूर, आडमार्गावर लपवून ठेवले जात आहेत.

तपासणी नाके असूनही लाकडांचे ट्रक बेधडक बाहेर! या जंगलांमधून दररोज मौल्यवान लाकडांनी गच्च भरलेले मोठे ट्रक मुख्य रस्त्यावरून बिनदिक्कतपणे तालुक्याबाहेर जात आहेत. रस्त्यांवर वन विभागाचे नाकेबंदी किंवा तपासणी नाके असूनही या वाहनांना कुठेही अडवले जात नाही. त्यामुळे “या तपासणी नाक्यांवर नक्की चालतं काय?” आणि “प्रशासन लाकूड माफियांच्या पुढे इतकं हतबल का झालंय?” असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत.

‘तोडपाणी’ आणि मेहेरबानीचा गंभीर आरोप निसर्गाचा असा उघड-उघड ऱ्हास होत असतानाही वन विभाग कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने नागरिकांचा संशय बळावला आहे. वन विभागाच्या वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे या लाकूड माफियांसोबत आर्थिक साटेलोटे म्हणजेच ‘तोडपाणी’ सुरू आहे का, असा थेट आरोप निसर्गप्रेमी आणि स्थानिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांची ‘मूठ’ दाबल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होणे अशक्य आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या भागातून उमटत आहे.

स्थानिक वन अधिकारी केवळ कारवाईचे सोंग आणत असून, प्रत्यक्षात त्यांच्या निष्क्रीयतेमुळे संगमेश्वरचा हिरवागार निसर्ग धोक्यात आला आहे. या प्रकरणी आता वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करून, दोषी अधिकाऱ्यांवर आणि लाकूड माफियांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular