30.6 C
Ratnagiri
Sunday, June 8, 2025

राजापुरात आठवडा बाजारातील नियम धाब्यावर…

शहरात दर आठवड्याला भरणाऱ्या आठवडा बाजारासाठी घाटमाथ्यावरून...

मुरुड किनारी मृत कासव ठेवले झाडाला टांगून…

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी कासवाला मारून झाडाला...

महिलेला १० लाख रुपयांना गंडा, जादा परताव्याचे आमिष

सोशल मीडियावर वर्कफ्रॉम होमच्या नावाखाली गुंतवणुकीत जादा...
HomeRatnagiriरत्नागिरीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खूनप्रकरणी हाडांचा डीएनए रिपोर्ट मॅच

रत्नागिरीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खूनप्रकरणी हाडांचा डीएनए रिपोर्ट मॅच

गडबडीत घमेल्याने राख भरताना त्यातील काही हाडे आणि मांस, दात तिथेच पडले होते.

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. स्वप्नाली सुकांत सावंत यांच्या खूनप्रकरणी तेथे सापडलेले मास, दात आणि ७ ते ८ मानवी हाडांचा डीएनए रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे घटनास्थळी सापडलेली हाडे, मांस आणि एक दात हा मयत स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. सौ. स्वप्नाली सावंत (३५) या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. कौटुंबिक कलहातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी त्यांचा पती सुकांत सावंत याच्यासह अन्य आरोपींना अटक झाली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री (३१ ऑगस्ट २०२२) सुकांतच्या मालकीच्या चाळीत तिघा आरोपींनी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. त्यांनी तिची राख समुद्रात फेकून दिली होती. पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली होती.

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार – सुरूवातीला पती सुकांत सावंत याने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात नोंदवली होती आणि त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली. याच दरम्यान दि. १० सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांची आई संगीता शिर्के (६४) यांनी सुकांतला भेटून तिच्या बेपत्ता होण्याशी तुमचा काही संबंध आहे का? असे विचारले असता, त्याने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बेपत्ता मुलीवरुन संगीता शिर्केंचा जावयाशी वाद झाला आणि सुकांतने स्वप्नाली यांची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर संगीता यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पती सुकांत सावंतसह इतर दोघांना अटक केली होती.

७ ते ८ हाडे सापडली – तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हा खुन झाल्याचे जाहीर केले होते. स्वप्नाली सुकांत सावंत यांचा मृतदेह जाळल्यानंतर राख गडबडीत गोणीत भरणे संशयित आरोपींना तेव्हा महागात पडले आहे. त्यांची हीच चूक हेरत पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या खुनप्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मृतदेहाची ६ ते ८ हाडे आणि कुजलेले मांस पोलिसांना सापडले आहे. तसेच एक दातही मिळाला होता. हे सारे नमुने डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

मृतदेह पेटवला – पत्नी स्वप्नाली हिचा खून करून सुकांत याने मृतदेह लपवून ठेवला होता. त्यानंतर रात्रीच्यावेळी मृतदेहावर पेंढा टाकून रात्रीच्यावेळेस मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता व झालेली राख गोणीत भरून समुद्रात टाकल्याचे सुकांत याने पोलीस तपासात सांगितले होते.

तिघांवर गुन्हा – पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांची आई सौ. संगिता कृष्णा शिर्के यांनी ११ सप्टेंबरला दिली. त्यामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत, रुपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊफ प्रमोद गावणग या तिघाना मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सांवत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना अटकही करण्यात आली.

७ पथके – तत्कालीन अधीक्षक मोहितकुम र गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपीच्या नेतृत्वाखाली ७ तपासपथके तयार करण्यात आली. गुन्ह्यातील ठोस पुरावे शोधून काढण्याबाबत वेगवेगळी उद्दिष्ठे त्यांना देण्यात आली. तीन दिवस पोलिसांनी अहोरात्र या प्रकरणाचा तपास केला. आरोपी सुकांत सावंत संशयित आरोपी वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत होता. वर्षभर खुनाचा कट रचून सर्व पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते.

एक चूक महागात पडली – त्याप्रमाणे सर्व घडत गेले. मात्र एक चुक त्यांना महागात पडली आणि त्यांचा कट उघड झाला. पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ६ ते ८ मानवी हाडे सापडली तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस आणि नंतर एक दातही मिळाला होता. यावरून तिथे खून झाल्याचे निष्पन्न झाले. सुकांत सावंत तसेच त्याचे साथीदार रुपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांनी पूर्वनियोजनाने व शांतपणे १ सप्टेंबरला २०२२ स्वप्नाली सावंत हिचा ती मिऱ्याबंदर येथील घरी दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेंढ्यामध्ये झाकून लपवून ठेवला होता. अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घराच्या आवारातच पेंढा आणि पेट्रोलने जाळून टाकला.

जाळल्यानंतर उरलेली राख २० बॅगांमध्ये भरून ती समुद्रात टाकून दिल्याचे तसेच ज्या ठिकाणी तिचा मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई केल्याचे उघड झाले. गडबडीत घमेल्याने राख भरताना त्यातील काही हाडे आणि मांस, दात तिथेच पडले होते. आरोपींची ही चूक महागात पडली आणि हा खुनाचा कट उघड झाला. याचा तांत्रिक व पारंपारिक पध्दतीने तपास सुरू आहे. गुन्ह्याशी संबंधित असलेले भौतिक पुरावे शोधून ते तज्ञांच्या मदतीने गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केले. मुलीच्या डिएनएबरोबर हा डिएनए मॅच करण्यासाठी पाठविण्यात आला होता. पोलिसांनी पाठविलेल्या मानवी अवशेषांचा डिएनए मॅच झाल्याचे पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ही केस पोलिसांच्यादृष्टीने अधिक भक्कम झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular