हंगामाच्या सुरुवातीला हापूस आंब्याला पोषक वातावरण होते; मात्र बदलत्या वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हापूसचे उत्पादन कमी येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. काही ठराविक भागातच फळधारणा झाल्यामुळे हे चित्र पावस परिसरात दिसत आहे. पावस परिसरातून आत्तापर्यंत हापूसच्या सुमारे तीनशे पेट्याच मुंबई, पुणे, अहमदाबादला रवाना झाल्या आहेत. पावस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील लोकांचे उत्पन्नाचे साधन म्हणून आंबा व्यवसायाकडे पाहिले जाते. अनेक बागायतदार सध्या या व्यवसायात गुंतलेले आहेत. सध्या बदलत्या हवामानाचा विचार करता या व्यवसायावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दरवर्षी कमी- जास्त फरकाने आंब्याचे पीक येत असून, दिवसेंदिवस ती संख्या घटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावर्षी हापूस आंब्याचे पीक कमी प्रमाणात असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठराविक गावांमधील भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात फळधारणा होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्प्याने बागेतील तयार झालेले फळ बाजारपेठेमध्ये पाठवण्यास सुरवात झाली आहे. फळधारणा कमी झाल्यामुळे तयार झालेल्या हापूस आंब्याला सध्या दर चांगला आहे. त्यामुळे ज्यांच्या बागेमध्ये आंबा तयार होतोय त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे; परंतु अनेक शेतकरी आंबा तयार नसल्यामुळे हवालदिल झाले आहेत. उत्पादनावर होणारा वर्षभराचा खर्च पाहता हे पीक परवडणारे नाही, अशी चर्चा आहे. मागील वर्षी सुमारे ६०० पेटी आंबा फेब्रुवारी महिन्यात बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यात आला होता; परंतु यावर्षी अवघ्या तीनशेच पेट्या विक्रीसाठी गेल्या आहेत.