27.6 C
Ratnagiri
Sunday, February 1, 2026

चिपळूणात काँग्रेससह उबाठा, राष्ट्रवादीला जोर का झटका

भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास...

मिऱ्या- नागपूर महामार्गाची ‘डेडलाईन’ हुकणार? मे अखेर काम पूर्ण होणे कठीण!

विदर्भ आणि कोकणाला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या...
HomeRatnagiriठाकरे सेनेतील दुफळीने शिवसेनेचे पारडे जड

ठाकरे सेनेतील दुफळीने शिवसेनेचे पारडे जड

भाजपला देखील त्या मान्याने तालुक्यात विस्तार करता आला नाही.

रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. खालगाव, कोतवडे, वाटत, हातखंबा गटामध्ये तिरंगी लढत होणार असून, उर्वरित सात गटांमध्ये थेट लढती आहेत. कुवारबाव गणात चौरंगी, पावस, खेडशी या दोन गणांमध्ये तिरंगी लढत होत असून, उर्वरित १७ गणांमध्ये थेट लढती आहेत. हातखंबा गटामध्ये परशुराम कदम हे अपक्ष लढत आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने गोळप गटामध्ये अपक्ष लढत असल्याने या दोन गटांत काँटे की टक्कर होणार आहे; परंतु भाजपला या तालुक्यात एकही जिल्हा परिषदेची जागा न मिळाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यात शिवसेनेला कितपत यश येईल, यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत. दुफळीमुळे उबाठा शिवसेनेतील मरगळ आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे मतदारसंघावर असलेल्या वर्चस्वामुळे शिवसेनेचे पारडे जड आहे. जिल्ह्यात घट्ट रोवलेली शिवसेनेची पाळेमुळे सैल झाली. शिवसेनेचे बहुतांशी शिलेदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना रत्नागिरी तालुक्यात एकाकी पडली. उबाठामध्ये प्रचंड मरगळ आहे.

आता तालुक्यातील सर्वांत मोठा पक्ष हा शिंदे शिवसेना आहे. भाजपला देखील त्या मान्याने तालुक्यात विस्तार करता आला नाही. तालुक्यातील या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवसेनेचे वर्चस्व स्पष्ट दिसते. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे आणि अंतर्गत राजकीय चढाओढीमध्ये हातखंबा गटातून शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. परशुराम कदम यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित असताना अंतर्गत राजकारणाचा ते बळी ठरले आहेत. त्यांना डावलून पक्षाने सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे हातखंबा गटामध्ये तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेचे सुयोग कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत आणि अपक्ष परशुराम कदम यांच्यात लढत होणार आहे. इथे उबाठाचा कदम यांना पडद्यामागून पाठिंबा असणार असल्याचे बोलले जात आहे.

गोळप गटामध्येही अशीच लढत होणार आहे. उबाठा शिवसेनेचे कट्टर समर्थक उदय बने यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी न दिल्याने ते पक्षातून बाहेर पडले. त्यांनी गोळप गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथे शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार मुरकर विरुद्ध अपक्ष उदय बने, अशी लढत होणार आहे. ती बने आणि उदय सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. अन्य गटांमध्ये विरोधकांकडून तुल्यबळ उमेदवार नसल्याने तिथे आठ गटांमध्ये शिवसेनेचे पारडे जड आहे. तालुक्यातील २० गणांपैकी दोन गण भाजपला सोडले आहेत. यामध्ये वाटद आणि हरचिरी गणाचा समावेश आहे. भाजपचे काम चांगले असल्याने तेथे भाजपचे पारडे जड आहे. उर्वरित १८ गणांवर शिवसेना लढणार आहे.

गोळप गणामध्ये मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे अविनाश गुरव हे हे रिंगणात आहेत. खेडशी गणामध्ये शिवसेनेचे वैभव पाटील, मनसेचे विशाल चव्हाण आणि उबाठाचे ज्ञानेश वाडकर अशी तिरंगी लढत होणार आहे. कुवारबाव गणात ठाकरे सेनेचे उमेश राऊत, शिंदे सेनेचे गजानन धनावडे, काँग्रेसचे परशुराम खेत्री आणि राष्ट्रवादीचे नारायण खोराटे, अशी चौरंगी लढत होणार आहे. पावस गणामध्ये ठाकरे सेनेचे सुभाष पावसकर, शिवसेनेचे नामदेव कोकरे, तर अपक्ष सचिन गिजबिले अशी तिरंगी लढत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular