HomeRatnagiriगणपतीपुळे रस्त्यांची दुरवस्था; कोल्हटकर तिठा ते मोरया चौकात खड्ड्यांचे साम्राज्य, पर्यटकांमध्ये संताप

गणपतीपुळे रस्त्यांची दुरवस्था; कोल्हटकर तिठा ते मोरया चौकात खड्ड्यांचे साम्राज्य, पर्यटकांमध्ये संताप

मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्याची चाळण; चिखलातून शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास, प्रशासनाचे दुर्लक्ष

गणपतीपुळे: कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या गणपतीपुळे येथील मुख्य रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येथील मुख्य मार्गांवर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून, रस्त्यांवर जणू ‘खड्ड्यांचे साम्राज्य’ पसरले आहे. कोल्हटकर तिठा ते मोरया चौक या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची मुसळधार पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, लहान शाळकरी मुले आणि दूरदूरवरून येणारे पर्यटक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शाळकरी मुलांची चिखलातून कसरत कोल्हटकर तिठा ते मोरया चौक हा मार्ग वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने या भागातील मुख्य कणा मानला जातो. विशेष म्हणजे, याच मुख्य रस्त्यावर गणपतीपुळे गावाची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. चिमुरड्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना याच चिखलातून आणि पाण्यातून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण असून, एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे.

कोट्यवधींचा विकास आराखडा कागदावरच? विशेष बाब म्हणजे, गणपतीपुळे परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा ‘पर्यटन विकास आराखडा’ मंजूर केला आहे. या अंतर्गत आपटा-तिठा ते मंदिर परिसराकडे जाणाऱ्या काही मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, दरवर्षी सर्वाधिक दुरवस्था होणाऱ्या कोल्हटकर तिठा ते मोरया चौक या मुख्य रस्त्याला काँक्रिटीकरणातून वगळण्यात आले की काय, असा प्रश्न पडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था होते, प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करते आणि पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. स्थानिक प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

मालगुंड ते वरवडे मार्गावरही जीवघेणा प्रवास केवळ मुख्य बाजारपेठच नाही, तर मालगुंड आणि वरवडेकडे जाणाऱ्या आपठा तिठा ते कोल्हटकर तिठा या जोडणाऱ्या मुख्य मार्गावरही ठिकठिकाणी खड्ड्यांची मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा आणि आकाराचा अंदाज येत नाही. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता जोपर्यंत पूर्णपणे काँक्रिटचा होत नाही, तोपर्यंत किमान त्यावर तातडीने डांबरीकरण किंवा खडीकरण करून रस्ता सपाट करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पर्यटनाच्या प्रतिमेला बट्टा गणपतीपुळे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे दररोज हजारो भाविक आणि पर्यटक भेट देतात. मात्र, प्रवेश करतानाच जर रस्त्यांची अशी दुरवस्था असेल, तर पर्यटनाच्या जागतिक प्रतिमेला बट्टा लागत आहे. “अपघात टाळण्यासाठी आणि गावाचे नाव खराब होऊ नये म्हणून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने यात गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता त्वरित दुरुस्त करावा,” अशी आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular