HomeRatnagiriरघुवीर घाट पर्यटकांसाठी १ महिना बंद; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

रघुवीर घाट पर्यटकांसाठी १ महिना बंद; जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

भूस्खलन आणि रस्ता खचल्याने खेड प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश; फक्त एसटी आणि अत्यावश्यक सेवांना परवानगी.

निसर्गरम्य कोकणात पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपसूकच घाटांकडे वळू लागतात. खेड तालुक्यातील प्रसिद्ध ‘रघुवीर घाट’ हा तर पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जातो. मात्र, जर तुम्ही या दिवसांत रघुवीर घाटात फिरण्याचा बेत आखत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेला धोका पाहता, जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला असून पर्यटकांसाठी हा घाट पुढील १ महिन्यासाठी पूर्णपणे बंद केला आहे.

खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी सुरक्षेच्या कारणास्तव ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत घाटात पर्यटनासाठी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

घाटात नेमकी काय परिस्थिती आहे?

रघुवीर घाटातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ ची अवस्था सध्या खूपच धोकादायक बनली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरील माती आणि मोठमोठे दगड रस्त्यावर सरकून आले आहेत. डांबरी रस्त्याला अनेक ठिकाणी गंभीर तडे गेले असून, दरीच्या बाजूची रस्त्याची कडा पूर्णपणे कोसळली आहे. काही ठिकाणी तर रस्ता आणि बाजूची साईडपट्टी खचल्याने या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. डोंगरातून अचानक दरड कोसळण्याची आणि जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता लक्षात घेऊनच प्रशासनाने हा कठोर पाऊल उचलले आहे.

वाहतुकीवर काय मर्यादा असणार?

घाटातील वाढता धोका लक्षात घेऊन वाहनांच्या येण्या-जाण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत:

  • खाजगी आणि जड वाहनांना बंदी: सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गाड्या, खाजगी वाहने आणि जड-अवजड वाहनांना घाटात प्रवेश करण्यास पूर्णपणे ‘नो-एन्ट्री’ असेल.

  • एसटी आणि अत्यावश्यक सेवांना सवलत: प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस आणि केवळ अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहनांना काही अटी व शर्तींसह या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पावसाळी निसर्गाचा, धुक्याचा आणि धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे हजारो पर्यटक गर्दी करतात. पण यंदा निसर्गाचे रौद्ररूप पाहता, कोणताही अनपेक्षित अपघात घडू नये म्हणून पर्यटकांना घाटातील मुख्य पर्यटन स्थळांवर थांबण्यास किंवा गाड्या उभ्या करण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे या पावसाळ्यात स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी रघुवीर घाटाकडे जाणे टाळलेलेच बरे!

RELATED ARTICLES

Most Popular