रत्नागिरीकरांनो, घराबाहेर पडताना थोडं सावध राहण्याची वेळ आली आहे. कारण रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. मिरजोळे येथील पाटील वाडीमध्ये चोरांनी दिवसाढवळ्या एका बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. नेहमी रात्रीच्या अंधारात हातसफाई करणारे चोर आता चक्क भरदिवसा घरफोडी करत असल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण आहे.
नेमकी घटना कशी घडली? मिरजोळे येथील पाटील वाडीत राहणारे राजेश बबन भाटकर हे नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीसह सकाळी आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले होते. घर बंद असल्याने बाहेरून कुलूप लावलेले होते. घरामध्ये कोणीही नसल्याची खात्री अज्ञात चोरांनी आधीच करून घेतली असावी, असा संशय आहे. भाटकर पती-पत्नी कामावर जाताच, चोरट्यांनी दुपारच्या सुमारास त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात घुसल्यानंतर चोरांनी कपाटांचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला आणि काही क्षणातच तिथून पोबारा केला.
घरमालक परतले अन्… राजेश भाटकर हे संध्याकाळी आपले काम संपवून जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि तुटलेल्या अवस्थेत दिसला. घरात पाऊल टाकताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली; कारण घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. कपाटांची तपासणी केली असता, त्यातील सुमारे ९ तोळे वजनाचे मौल्यवान सोन्याचे दागिने आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम गायब होती. भाटकर यांनी तातडीने या घटनेची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना दिली.
पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने मिरजोळे पाटील वाडी येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला आहे. परिसरात किंवा पाटील वाडी भागात दुपारच्या वेळी कोणाची संशयास्पद हालचाल दिसली होती का, यादृष्टीने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
परंतु, या घटनेमुळे आता रहिवाशांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दिवसा घर बंद ठेवून बाहेर पडतानाही नागरिकांच्या मनात धाकधूक वाढली आहे.

