खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) कशेडी बोगद्याच्या नजीक गुरुवारी एक धडकी भरवणारा अपघात घडला. अमोनिया गॅस वाहून नेणाऱ्या भरधाव टँकरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने टँकर थेट महामार्गावरच पलटी झाला. अमोनिया गॅस अत्यंत विषारी आणि घातक असल्याने अपघाताची बातमी समजताच महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र सुदैवाने टँकरमधून कोणतीही गॅसगळती न झाल्याने मोठा भीषण अनर्थ टळला आहे.
अलिबागहून लोटे एमआयडीसीकडे चालला होता प्रवास
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा टँकर अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील ‘प्रेरणा केमिकल्स’ या कंपनीसाठी अमोनिया गॅस घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होता. टँकर कशेडी बोगद्यासमोर आला असता, अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि प्रचंड वेगात असलेला टँकर रस्त्यावरच कलंडला.
प्रशासन अन् सुरक्षा यंत्रणांची तातडीने धाव
अपघाताचे गांभीर्य ओळखून पोलीस दल तसेच लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीचे सुरक्षा अधिकारी व प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा यंत्रणांनी क्षणाचाही विलंब न लावता टँकरची कसून पाहणी केली. पाहणीदरम्यान गॅस टँकरला कुठेही तडे गेलेले नसून गॅसगळती पूर्णपणे टळल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलीस व स्थानिक प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली.
चालक जखमी, प्रकृती स्थिर
या दुर्घटनेत टँकर चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

