रत्नागिरी: गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच नवजात बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’ला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ४०.४४ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.
जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या ४,२२२ गरोदर महिलांच्या एकूण उद्दिष्टापैकी आतापर्यंत १,५०० पात्र महिलांची यशस्वी नोंदणी पूर्ण झाली आहे.
योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक साह्य कसे आहे?
या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे एवढाच नसून, गरोदरपणाच्या काळात महिलेला पोषक आहार मिळावा आणि नवजात बालकाचे योग्य लसीकरण व्हावे हा आहे. पात्र महिलांना अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाते:
-
पहिल्या अपत्यासाठी:
गरोदरपणाची नोंदणी आणि आवश्यक आरोग्य तपासण्या वेळेवर पूर्ण केल्यास पहिल्या अपत्यासाठी मातेला ५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
-
दुसऱ्या अपत्यासाठी (मुलगी झाल्यास विशेष प्रोत्साहन):
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे या हेतूने, जर दुसरे अपत्य मुलगी असेल आणि तिचे संपूर्ण लसीकरण वेळेत पूर्ण झाले, तर मातेला ६,००० रुपयांचे विशेष अनुदान दिले जाते.
तालुकानिहाय नोंदणीत ‘रत्नागिरी’ तालुका अव्वल
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही मोहीम जोमाने सुरू असून नोंदणीच्या बाबतीत रत्नागिरी तालुक्याने आघाडी घेतली आहे. तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे:
-
रत्नागिरी: ६५८
-
चिपळूण: २८२
-
संगमेश्वर: १४३
-
दापोली: १२६
-
खेड: १२०
-
राजापूर: ९६
-
लांजा: ६८
-
गुहागर: ४८
-
मंडणगड: ३६
प्रशासनाचा महत्त्वाचा संदेश:
“प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याला ४,२२२ गरोदर महिलांचे उद्दिष्ट मिळाले असून आतापर्यंत १,५०० महिलांची यशस्वी नोंदणी झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र गरोदर महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा.”
— मल्लीनाथ कांबळे, महिला व बालकल्याण अधिकारी, रत्नागिरी.

