गुहागर: अचानक वीज गेली की संपूर्ण गाव अंधारात बुडून जातं, त्यात रात्रीची वेळ असेल तर अडचणी अधिकच वाढतात. असाच काहीसा प्रसंग गुहागर तालुक्यातील आबलोली परिसरात घडला. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि अंधाऱ्या रात्री घेतलेल्या अखंड परिश्रमांमुळे तब्बल १५ गावांमधील वीजपुरवठा अवघ्या ५ तासांत पूर्ववत करण्यात यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या या धडपडीमुळे परिसरातील सुमारे ४,५०० ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
नेमकी काय घडली होती घटना?
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानाजवळ आबलोली उपकेंद्रावरून जाणाऱ्या ११ केव्ही (11 KV) वीजवाहिनीच्या खांबावरील ‘व्ही क्रॉस’ आणि मुख्य वीजतार अचानक तुटली. ही घटना घडताच आबलोली उपकेंद्रावरून निघणाऱ्या ११ केव्ही पडवे फिडरवरील वीजप्रवाह पूर्णपणे खंडित झाला. परिणामी, परिसरातील १५ गावे सलग ५ तास काळोखात बुडाली होती.
अंधाऱ्या रात्री सलग ५ तास युद्धपातळीवर काम
वीज खंडित झाल्याची माहिती मिळताच महावितरण आबलोलीचे शाखा अभियंता सुजय निकम यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रकाशदूत प्रशांत कदम, संजय आग्रे, विशाल भोसले, प्रसाद शिगवण, अनिकेत जाधव, शैलेश वेलुंडे आणि सागर चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
रात्रीच्या वेळी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता या कर्मचाऱ्यांनी सलग ५ तास अथक मेहनत घेतली. तुटलेली तार आणि व्ही क्रॉस बदलून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले.
ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य
महावितरणच्या या मोहिमेत आबलोली येथील स्थानिक ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवत कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. ग्रामस्थ आणि महावितरण यांच्यातील समन्वयामुळे मध्यरात्री हे काम यशस्वीपणे फत्ते झाले आणि अंधारात बुडालेली १५ गावे पुन्हा एकदा प्रकाशाने उजळून निघाली. संकटसमयी तातडीने धावून येणाऱ्या या प्रकाशदूतांचे आणि अधिकाऱ्यांचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

