बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे असंसर्गिक आजार (Non-Communicable Diseases) झपाट्याने वाढत आहेत. अनेकदा या आजारांची सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत, परिणामी आजार गंभीर रूप धारण करेपर्यंत त्याकडे दुर्लक्ष होते. नागरिकांचे हेच दुर्लक्ष टाळण्यासाठी आणि संभाव्य आजारांचे वेळेत निदान व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यभरात एक विशेष आरोग्य मोहीम हाती घेतली आहे.
याच उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान तब्बल १०० दिवसांची व्यापक आरोग्य तपासणी मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
७ लाखांहून अधिक नागरिकांचे उद्दिष्ट
रत्नागिरी जिल्ह्यात या १०० दिवसांच्या कालावधीत ७ लाख ७४ हजार ३५० नागरिकांची मोफत तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य प्रशासनाने निश्चित केले आहे. यापूर्वी राबवलेल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार ६९२ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली होती. त्यामुळे ज्यांची आधी तपासणी झालेली नाही, अशा उर्वरित सर्व नागरिकांवर या विशेष मोहिमेत भर दिला जाणार आहे.
पथके थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचणार
नागरिकांना रुग्णालयात चकरा माराव्या लागू नयेत म्हणून आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे. यासाठी जिल्ह्यात तीन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि संबंधित आरोग्य अधिकारी यांचा समावेश असून, हे कर्मचारी थेट घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करणार आहेत.
पुढील उपचारांचीही चोख व्यवस्था
घरोघरी सुरू असलेल्या या तपासणीदरम्यान एखाद्या नागरिकांमध्ये कोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे किंवा शंका आढळल्यास, त्यांना तातडीने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) पाठवले जाईल. तेथे आवश्यक त्या अधिक चाचण्या केल्या जातील आणि गरज भासल्यास पुढील उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात संदर्भित (Refer) केले जाईल. यामुळे गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वीच रुग्णाला योग्य ते उपचार मिळणे शक्य होणार आहे.
आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
आरोग्य यंत्रणा तुमच्या दारात येत असून, नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
-
अतिरिक्त आरोग्य अधिकारी महेंद्र गावडे यांनी आवाहन केले आहे की, “विशेषतः ३० वर्षांवरील सर्व नागरिकांनी या तपासणीसाठी स्वतःहून पुढे यावे. कोणतेही छोटे-मोठे लक्षण जाणवत असल्यास अंगावर न काढता तपासणी करून घ्यावी.”
-
तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी नागरिकांना घरापर्यंत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे व आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

