रत्नागिरी: ज्या युगपुरुषाच्या नावाने महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा शासकीय फलकांवरच अनादर होत असल्याचा प्रकार रत्नागिरीत समोर आला आहे. रत्नागिरी शहरात नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या एका प्रवासी निवारा शेडच्या नामफलकावर छत्रपतींचा थेट एकेरी उल्लेख करण्यात आल्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र संताप व्यक्त करत थेट नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रसिद्धीसाठी नाव, पण सन्मानाचा सोयीस्कर विसर?
रत्नागिरी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदेमार्फत एक प्रवासी निवारा शेड (Bus Stop Shelter) बांधण्यात आले आहे. या निवारा शेडवर लावण्यात आलेल्या नामफलकावर महाराजांचा आदरयुक्त उल्लेख न करता एकेरी भाषेत नाव नोंदवण्यात आले आहे. या प्रकारावर बोट ठेवत मनसेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
“राजकीय स्वार्थासाठी किंवा केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी छत्रपतींच्या नावाचा वापर सर्वत्र केला जातो. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष फलक लावले जातात, तेव्हा त्यांच्या नावापुढे योग्य तो सन्मान किंवा आदर जोडण्याचा सोयीस्कर विसर पडतो,” असा रोखठोक आरोप जाधव यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनासह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन पाठवून या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष वेधले आहे.
महिनाभरात दुरुस्ती करा, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने उत्तर!
स्थानिक शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा हा फलक प्रशासनाने त्वरित बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदरपूर्वक आणि योग्य उल्लेख असलेला नवा फलक लावावा, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे. यासाठी प्रशासनाला एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
जर येत्या महिनाभरात हा नामफलक सन्मानपूर्वक बदलण्यात आला नाही, तर मनसे स्वतः रस्त्यावर उतरून आपल्या पद्धतीने त्या शेडचे ‘योग्य ते नामकरण’ करेल, असा सज्जड इशाराही रुपेश जाधव यांनी दिला आहे. मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता रत्नागिरी नगरपरिषद प्रशासन या नामफलकाबाबत तातडीने काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

