दापोली शहरामध्ये प्रशस्त असे आझाद मैदान आहे; मात्र हे मैदान आता डंपिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टाकाऊ वस्तूंनी आझाद मैदान भरत असले तरी दापोली नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. दापोली शहरातील इमारतींचे नूतनीकरण करण्यात येते; मात्र जुने, नादुरुस्त सामान, लाद्या आदी साहित्य आझाद मैदानावर आणून टाकले जात आहे. यामुळे एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मैदानाकडे प्रवेश केल्यानंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे दर्शन होत आहे शिवाय मैदानात वाढलेली झाडी यामुळे बिनधास्तपणे या ठिकाणी कचरा आणून टाकला जातो.
आझाद मैदानात रात्रीच्या सुमारास मद्यपीदेखील बसलेले असतात तसेच या ठिकाणी मद्यप्राशन करून झाल्यानंतर दारूच्या बाटल्या तिथेच टाकून जातात. शहरामध्ये विविध संस्था, संघटनांमार्फत स्वच्छता करण्यात येते; मात्र आझाद मैदानाकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे चित्र वाढत्या कचऱ्यामुळे समोर आले आहे. दापोलीच्या मुख्य रस्त्यांवर, बाजारांमध्ये गल्ल्यांमध्ये जरी स्वच्छता करण्यात येत असली तरी आझाद मैदानाचा श्वास मात्र प्लास्टिक पिशव्या, ग्लास, बाटल्या, कपडे इतर साहित्यांनी कोंडला जात आहे. आझाद मैदानात विविध स्पर्धा होतात तसेच मेळावे देखील असतात; परंतु आझाद मैदान मात्र स्वच्छतेची प्रतीक्षा करीत आहे.