आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा, तसेच नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वात अभिनेता भरत जाधव कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य करताना दिसतो. नुकतेच त्याने नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर लक्ष वेधले होते. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्ती विषयी काही माहिती लिहितो. अशीच एक पोस्ट त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने लिहिली आहे.
राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असतो. या दिवसाचं औचित्य साधून भरत जाधवने एक विशेष पोस्ट लिहिली आहे . यात राज यांचा स्वभाव नेमका कसा आहे इथपासून ते कलाकारांसोबतचे त्यांचे संबंध कसे आहेत याचं वर्णन केलं आहे. भरत म्हणतो, ‘मा. राजसाहेब ठाकरे..!! खुप वर्षांपासूनची आमची ओळख आहे. मुळात ते राजकारणात जरी सक्रिय असले तरी जेंव्हा कधी आम्ही भेटतो तेंव्हा ते राजकारण या विषयावर कधीच बोलत नाहीत. मराठी नाटक, मराठी सिनेमामध्ये सध्या काय चाललंय, जागतिक सिनेमामध्ये सध्या काय चाललंय यावरच सगळ्या गप्पा टप्पा मारतात. सगळ्याच कलाकृतींवर त्यांचंलक्ष असून, चांगलं निरीक्षण देखील सांगतात ते. आपण कुठल्या नवनवीन गोष्टी करायला हव्यात हेही ते सुचवतात.’
पुढे तो म्हणतो, ‘मध्यंतरी कोरोना काळात केदार शिंदे त्यांना भेटायला गेला तेंव्हा लॉकडाऊन आणि त्या सर्व गोंधळात नाट्यगृह आणि चित्रपटगृह काही लवकर उघडण्याची चिन्ह दिसत नाहीत म्हणून पुन्हा टेलिव्हिजन करा हे सुचवणारे ही सर्वस्वी तेच होते. त्यातुनच पुढे ‘सुखी माणसाचा सदरा’ ची निर्मिती झाली ज्याद्वारे मी टिव्ही वर पुनरागमन केलं, हे भरत जाधव यांनी आवर्जून सांगितले. राज ठाकरे चटकन कोणाला जवळ करत नाहीत, पण एकदा ओळख झाली आणि त्यांच्या मनात भरलेल्या व्यक्तीसाठी ते कोणत्याही स्तरावर मदत करायला मागे पुढे पहात नाहीत.