बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे खेड, गुहागर, दापोली, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून, समुद्रही खवळलेला आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे, गावखडी, मिऱ्या, गणपतीपुळे येथे भरतीवेळी समुद्राच्या लाटा उसळत होत्या. वादळामुळे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही; मात्र जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे किनारी भागातील नागरिक सतर्क झाले होते. जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी २ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. आज पहाटेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. वेगवाने वारेही वाहत होते.
रत्नागिरी शहरासह परिसरातील गावांमध्ये पावसाची नोंद झाली. पंधरा ते वीस मिनिट पडलेल्या हलक्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. चक्रीवादळ पुढे सरकत उत्तरेकडे गेल्यामुळे मोठा परिणाम जाणवलेला नाही; परंतु दिवसभर किनारी भागात वारे वाहत होते. दापोलीत हर्णे, आंजर्ले परिसरात पहाटेला वारे वाहत होते. प्रशासनाच्या आवाहनामुळे खाडी किनारी छोट्या होडीने मासेमारी करणारेही समुद्रात गेले नाही. शुक्रवारी सायंकाळी गावखडी किनाऱ्यावरील सुरूची झाडे लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आहेत.