चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील घराघरांत राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचवण्याचे नियोजन प्रत्येकाने करायला हवे, अशा सूचना जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या झालेल्या जिल्हा कार्यकारिणीत दिल्या आहेत. राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकारिणींच्या नियुक्त्या करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक रत्नागिरीतील जिल्हा कार्यालयात झाली. या बैठकीमध्ये सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष मयेकर यांच्यासह जिल्हा निरीक्षक बबनराव कनावजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रदेश सरचिटणीस बारक्याशेठ बने, प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिवगण, प्रदेश सचिव अमोल शिरसेकर, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता तांबे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, ओबीसी जिल्हाध्यक्ष सिद्धेश शिवलकर उपस्थित होते.
जिल्ह्यात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा हक्काचा आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष घराघरांत पोहोचवण्याचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी करावयाचे आहे. त्यासाठी तालुक्यातील पक्षातील रिक्त पदांवर नियुक्त्या करा, अशा सूचना मयेकर यांनी दिल्या आहेत, तसेच जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील गाव तिथे शाखा, तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी, बुथकमिटी, पाच विधानसभा मतदारसंघांचा आढावा तसेच महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा करण्यात आली. विविध सेलच्या नियुक्त्या करण्याबाबत सूचना दिल्या. या वेळी तालुकास्तरीय नियुक्तीपत्रेही देण्यात आली.
सर्वाधिक लक्ष चिपळूणवर – कार्यकारिणीच्या निमित्ताने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जोरदारी तयारीला लागली असून, सर्वाधिक लक्ष चिपळूण मतदारसंघात राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्यामुळे त्या दृष्टीने नियोजन सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.