राज्यात कोरोना संसर्गामध्ये रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. रत्नागिरीमध्ये दिवसाला साधारण ४०० ते ५०० च्या मधे रोज संसर्गित रुग्ण सापडत आहेत. याला कारण कुठेतरी संक्रमित रुग्णांचा बेजबाबदारपणा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभाव अन्यथा लोकांमध्ये असलेली कोरोना चाचणी बाबतची भीती हेच मुख्य कारण जबाबदार आहेत. रत्नागिरी जिल्हा सध्या चौथ्या टप्प्यात अनलॉक झाला असून, पॉझिटीव्हीटी रेट १४.१२ टक्के इतका आहे.
ब्रेक द चेनच्या चौथ्या टप्प्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमीत कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागामध्ये कोरोना चाचणीचे धोरण कडक केले आहे. गावामध्ये कोरोना केसेस जास्त वाढल्याने चाचण्यांची संख्याही वाढवण्याकडे प्रशासनाने भर दिला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच कोरोना संक्रमीतांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे, त्यांची नीट चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. काही जण या चाचण्या करून घेण्यास नकार दर्शवत आहेत.
जिल्ह्यात बरेचसे लोक सामान्य लक्षण जाणवत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात, शासन वेळोवेळी जागरूक करत असूनही नागरिक चाचण्या करून घ्यायला पुढे येत नाही. आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. परंतु, आता भविष्यात कोरोनाचे लक्षण असलेले लोक चाचणीला तयार न होता, विरोध करत असतील तर अशा विरोध दर्शविणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत आणि जे बाधित रुग्ण असतील त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याकडे भर दिला जाणार आहे. त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे.