गुरूवारी २५ मे रोजी सकाळी ११ वा. येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या वाढलेला उन्हाचा कडाका लक्षात घेऊन नागरिकांसाठी मंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये ए.सी. देखील बसविण्यात आले आहेत. सुमारे १० हजार नागरिक बसतील अशी व्यवस्था या मंडपात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ना. एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा रत्नागिरी दौरा असून मागील वेळी देखील याच मैदानावर त्यांची सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी वासियांसाठी जवळपास ८०० कोटी रूपयांच्या विकास कामांची भेट दिली होती.
शासन आपल्या दारी – शासनाने आणि प्रशासनाने लोकाभिमुख पद्धतीने कामकाज करावे अशी नागरिकांची अपेक्षा असते. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आलेले शिवसेना-भाजप युतीचे सरकार ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘शासन . आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. जनतेला कमीत कमी वेळात लाभ मिळाला पाहिजे. लागणारे दाखले, अन्य कागदपत्र वेळेत उपलब्ध झाली पाहिजेत या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे.
आज रत्नागिरीत – गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुमारे २५ हजार व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. दिव्यांगांसाठी दाखले किंवा अन्य कामांसाठी आवश्यक असणारे दाखले मुख्यमंत्र्यांच्याहस्ते या कार्यक्रमात वितरीत करण्यात येणार आहेत.
दिव्यांगांना साहित्य वाटप – त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून दिव्यांगांना मदतीचे साहित्य वाटण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या अनेक उपक्रमांचा शुभारंभदेखील मुख्यमंत्री त्यांच्या या एकदिवसाच्या दौऱ्यात करणार आहेत.मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हेदेखील. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीत उपस्थित राहत आहेत.
रोजगार मेळाव्याचे आयोजन – लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप किंवा दाखल्यांचे वाटप केले जात असताना तरूणांसाठी बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजनदेखील करण्यात आले. ५०० कंपन्यांचे अधिकारी या मेळाव्यासाठी आले होते. तरूणांना ऑन द स्पॉट नोकरी देणारा हा उपक्रम असून त्या माध्यमातून आपल्या भागातील जास्तीत जास्त तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला आहे. हा दुसरा रोजगार मेळावा आहे. ३ महिन्यांपूर्वी असाच एक मेळावा रत्नागिरीत झाला होता.
पर्यटनातून विकास – त्याच्याच जोडीला येथील निसर्गसौंदर्य लक्षात घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी अनेक उपक्रम पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहेत. रत्नागिरीतील भगवती किल्ल्यावर भव्य-दिव्य अशी शिवसृष् टी साकारत असून या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला.
शिवसृष्टीची उभारणी – रत्नदुर्ग किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यात येत असून त्यामध्ये २० फूट ‘उंचीचा शिवरायांचा पुतळा त्याचप्रमाणे ९ जलदुर्गांची प्रतिकृती आणि अन्य काही प्रसंग साकारण्यात येणार आहेत. यानिमित्ताने पर्यटक येथे येतील आणि त्या माध्यमातून विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा ना. सामंत यांनी. व्यक्त केली आहे.
विकासाला चालना – बुधवारी रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आरोग्य शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य रूग्णांना त्याचा लाभ होणार आहे. विविध विकास कामांना मंजुरी मिळवत निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा पालकमंत्री या नात्याने ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.