कोकणातील विविध प्रश्नांवर ठोस काम कसे करता येईल, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत चर्चा केली. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिंदे यांनी शिवसेना नेते कदम यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या, अशी पोस्ट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी या भेटीची माहिती दिली आहे. गुरुवारी (ता. २७)ला शिवसेना नेते कदम यांचा वाढदिवस कोकणवासीय शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेल्या या सच्चा शिवसैनिकाचे मार्गदर्शन आम्हाला निरंतर मिळत राहो, अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी कदम कुटुंबीयांच्यावतीने देखील मुख्यमंत्री शिंदे याचा शिंदेशाही पगडी, शाल, श्रीफळ आणि चाफ्याच्या फुलांचा हार घालून विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार योगेश कदम, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, युवासेना कोअर कमिटी सदस्य राज सुर्वे तसेच सर्व कदम कुटुंबीय आणि सहकारी उपस्थित होते. या वेळी शिवसेना नेते कदम व मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील अनेक समस्यांच्या बाबतीत चर्चा केली. कोकणच्या विकासासाठी आवश्यक सिंचन अनुशेष भरून काढणे तसेच रोजगार निर्मितीवर कसा भर देता येईल याबाबत दोन्हींनी चर्चा केली. कोकणला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक निश्चित प्रयत्न करण्याचे अभिवचन या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना दिले.