28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRajapurराजापूर आगारासमोर अजूनही संभ्रमावस्था!

राजापूर आगारासमोर अजूनही संभ्रमावस्था!

प्रवाशांसह वाहनांची सातत्याने वर्दळ असून, दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर एसटी डेपोसमोर ‘भुयारी मार्ग की जंक्शन’ हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. अद्यापही या भागातील काम अपूर्ण असून, रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. आधीच उतार आणि नागमोडी वळणे असलेल्या या भागामध्ये प्रवाशांसह वाहनांची सातत्याने वर्दळ असून, दिवसेंदिवस वर्दळ वाढत आहे. त्यामुळे डेपोसमोरील महामार्गाच्या रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास जाणार कधी आणि दुतर्फा वाहतूक सुरू कधी होणार, असा सवाल राजापूरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

असा आहे डेपोसमारील रस्ता – महामार्गाचे चौपदरीकरण होण्यापूर्वी एसटी डेपोसमोरील रस्ता चढ-उतार आणि वळणांचा होता. त्याच वेळी कमी रुंदीचाही होता; मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या भागामध्ये रस्त्याचे पूर्वीच्या तुलनेमध्ये रुंदीकरण झाले असले तरी वळण आणि चढ-उतार यांच्यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत. मुंबईकडून गोव्याकडे जाताना या रस्त्याच्या डाव्या बाजूला प्रियदर्शनी वसाहत, बंगलवाडी, गुरववाडी येथील लोकवस्तीसह बँका, सुवर्णपढी, विविध प्रकारची दुकाने, हॉटेल आहेत. उजव्या बाजूला एसटी डेपो, गुरववाडी येथील लोकवस्तीसह पेट्रोलपंप, विविध दुकाने आहेत. पुढे जवाहर चौकामध्ये जाणारा रस्ता आणि त्या भागामध्ये विविध प्रकारची दुकाने आहेत. याव्यतिरिक्त डेपो परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या इमारती झाल्या असून, नव्याने बिल्डिंगची उभारणी होत आहेत. बाजारपेठही विस्तारत आहे. त्यामुळे भविष्यात येथील लोकवस्ती वाढणार आहे.

वाहनांसह पादचाऱ्यांची वर्दळ – एसटी डेपोसमोरील भागामध्ये बाहेरगावी जाणाऱ्या आणि बाहेरगावावरून येणाऱ्या एसटी गाड्या या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला ‘क्रॉस’ करत एसटी डेपोमध्ये सातत्याने ये-जा करत असतात. त्याचवेळी शहरातील जवाहर चौकाकडून पुढे पेट्रोलपंप वा मुंबईकडील दिशेने किंवा तिकडून परत जवाहर चौकाकडे विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे. रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे विविध वाड्यावस्त्या, बँका, विविध स्वरूपाची दुकाने आहेत. त्यामुळे सातत्याने रस्ता ओलांडणारे पादचारी आणि शाळकरी मुलांची रहदारीही कायम असते. त्याचवेळी मुंबईकडून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईकडे सुस्साट धावणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते.

सुसाट वाहनचालक – महामार्गाचे चौपदरीकरण झालेले असल्याने मोकळ्या असलेल्या रस्त्यावर आधीच वाहनचालक सुसाट असतात. राजापूर डेपोसमोरील भागाचा विचार करता गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना अर्जुना नदीवरील सर्वाधिक उंचीच्या पुलापर्यंत येईपर्यंत पुढेही तसेच सुसाट जायचे आहे, अशा मानसिकतेमध्ये वाहनचालक असतात. पूल ओलांडून पुढे आल्यानंतर डेपोनजीकचे वळण लागले तरी सुसाट जायची मानसिकता कायम असते. अशीच काहीशी स्थिती मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांचीही असते. हॉटेल वॉटरसमोरील नागमोडे वळण ‘क्रॉस’ करून उड्डाणपुलाचा उतार कापून गोव्याच्या दिशेने पुढे जाताना वाहनचालक सुसाट असतात. रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे जा-ये करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांच्या वाहनांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नसते.

कधी आणि कसा रस्ता ओलांडायचा? – एसटी डेपोसमोरील भागामध्ये वाहनांसह पादचाऱ्यांची वर्दळ असते. उड्डाणपुलावरून खाली उतरणारा वाहनचालक शहरामध्ये जाण्यासाठी उड्डाणपुलाचा उतार संपताच उजवीकडे वळतात, तर काही उतार संपताच उजवीकडे वळण्याऐवजी थोडे पुढे जाऊन बंगलवाडीकडून येणाऱ्या रस्त्याच्या येथे उजवीकडे वळताना दिसतात. यामध्ये या वाहनचालकांना नेमकं कोठून कुठे जायचे? हे समजत नसल्याने ते द्विधा मनःस्थितीमध्ये सापडलेले दिसतात. उड्डाणपुलाचा उतार संपवून शहरामध्ये जाण्यासाठी नेमका कुठून ‘राईट टर्न’ अशा द्विधा मनःस्थितीमध्ये असलेल्या वाहनचालकांना डेपोतून झपकन बाहेर येणाऱ्या गाड्यांचाही सामना करावा लागतो. त्याचवेळी अर्जुना नदीवरील पूल क्रॉस करून चढाला लागल्यानंतर डेपोसमोरील नागमोडे वळण घेऊन गोव्याकडून मुंबईच्या दिशेने भरधाव धावणाऱ्या वाहनाचाही अंदाज घ्यावा लागत आहे. प्रियदर्शनी वसाहत, बंगलवाडी, गुरववाडी, शीळ येथून येणारा वाहनचालकही त्या ठिकाणच्या उतारामुळे झपकन रस्त्यावर येऊन त्याला रस्ता क्रॉस करावा लागत आहे. जवाहर चौकाकडून मुंबईकडे वा त्या परिसरात रस्त्याच्या पलीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनाही सर्व दिशांनी येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन पुढे जावे लागते. दुसऱ्या बाजूला या भागामध्ये पादचारी, प्रवासी, शाळकरी मुले, ग्रामस्थ हेही विविध कामानिमित्ताने रस्त्यावरून अलीकडे आणि पलीकडे सातत्याने जा-ये करत असतात; मात्र वाहनांच्या वर्दळीतून निर्माण होणाऱ्या साऱ्या गोंधळामध्ये या ठिकाणी नाहक अपघाताला आमंत्रण दिले जात आहे.

प्रवासी निवारा शेडची प्रतीक्षा – राजापूर एसटी डेपोसमोरून मुंबई-गोवा महामार्ग जात असून, एसटी डेपोसमोर गाड्यांमधून उतरणारे आणि विविध गावांमध्ये जाण्यासाठी गाड्या पकडणारे मोठ्या संख्येने प्रवासी थांबलेले असतात; मात्र या ठिकाणी प्रवासी निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यामध्ये रखरखते ऊन आणि जोरदार पावसाचा सामना करत रस्त्याकडेला तासन्तास उभे राहावे लागत आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम करताना गावोगावी प्रवासी निवारा शेड उभारल्या जात असताना आवश्यकता असलेल्या एसटी डेपोसमोर प्रवासी निवारा शेड उभारण्याचे नियोजन दिसत नाही. त्याचा नाहक फटका प्रवाशांना बसत आहे.

वळण बनले धोकादायक – उड्डाणपुलाच्या पेट्रोलपंपाच्या पुढील भागातील काम अपूर्ण आहे. त्यामुळे एसटी डेपोकडून मुंबईच्या दिशेकडे जात असताना सुस्साट धावणाऱ्या वाहनांना फारसा अंदाज येत नसल्याने महावितरण कार्यालयाच्या येथील वळणावर अपघात झाले आहेत. त्यामुळे हे वळण धोकादायक बनले आहे. भविष्यातही या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या येथील अपूर्णावस्थेमध्ये असलेले काम वेळेतच पूर्ण होणे गरजेचे आहे.

उड्डाणपुलावरून एका बाजूने वाहतूक – उड्डाणपुलाच्या एका टोकाकडील काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. सद्यःस्थितीमध्ये काम सुरू असले, तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे उड्डाणपुलावरून सद्यःस्थितीमध्ये एका बाजूने वाहतूक सुरू आहे. उड्डाणपुलाच्या एका बाजूला धोकादायक वळण, तर दुसऱ्या बाजूला तीव्र उतार अशी रस्त्याची स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतुकीचा या भागातील वाहनांच्या वर्दळीला फटका बसतो. अपूर्णावस्थेमध्ये असलेले काम वेळेमध्ये पूर्ण करून उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular