पावसमधील गौतमी नदी गाळमुक्त झाल्यामुळे, या वर्षीच्या पावसाळ्यात अजूनही नदीला पूर आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी दहा लाखांचा निधी दिला होता. गौतमी नदी गाळात रुतल्यामुळे दरवर्षी पुराचे पाणी सखल भागात शिरल्यामुळे किनाऱ्यावरील भातशेतीचे नुकसान होत होते. हे प्रकार वारंवार होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. नदीचे पात्र दिवसेंदिवस उथळ बनल्याने येथील गाळ काढला जावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गाळ उपसण्याकरिता दहा लाखांचा निधी दिला. त्यामुळे पावस ग्रामपंचायत ते गणेश मंदिरादरम्यान सुमारे ४०० मीटर लांब, २० फूट रूंद परिसरातील गाळ काढण्यात आला. सात ते आठ फूट खोली झाल्यामुळे पाणी वाहून जाणे सोपे झाले आहे. काढलेला गाळ नदीपात्राबाहेर न ठेवता ग्रामस्थ घेऊन गेले. त्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर गाळ नदी पात्रात आला नाही. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला तरीही गौतमी नदीला पूर आलेला नाही. येथील वाहतुकही सुरळीत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्यांमधील गाळ काढण्यात आला; परंतु पुराचे पाणी त्याच पद्धतीत पूर्वीप्रमाणे राहिले असल्याचे दिसत होते तसेच नदीतील गाळ नदीपात्राबाहेर दूरवर न टाकल्यामुळे पुराचे पाणी आहे त्या स्थितीत घुसत राहिले, अशी स्थिती अन्य ठिकाणी होती; मात्र पावसमध्ये गाळाचे काम चांगल्या प्रकारे झाल्यामुळे यावर्षी पुराचे पाणी नदीपत्रात सरळ रेषेत जात होते. या संदर्भात पावस उपसरपंच प्रवीण शिंदे व सरपंच चेतना सामंत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, योग्य नियोजनामुळे निधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून मशिनरीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळे गाळ उपसा योग्य तऱ्हेने झाला.
दुसऱ्या टप्प्याचे नियोजन – उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील गणेशमंदिर ते बळगे स्मशानभूमीदरम्यान येणाऱ्या मे महिन्यामध्ये गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. पुढील वर्षांमध्ये गौतमी नदी पूर्णपणे गाळमुक्त होऊन पाणी सरळ रेषेत खाडीला मिळेल. त्यामुळे आजूबाजूच्या सखल भागामध्ये पाणी जाण्यास वाव राहणार नाही.