HomeDapoliदापोलीत पर्यटकांची स्टंटबाजी महागली! सालदुरे खाडीच्या चिखलात अडकली पुण्याची कार; पाहा थरारक...

दापोलीत पर्यटकांची स्टंटबाजी महागली! सालदुरे खाडीच्या चिखलात अडकली पुण्याची कार; पाहा थरारक व्हिडिओ

आंजर्ल्यानंतर दापोलीच्या सालदुरे खाडीत पर्यटकांचा बेजबाबदारपणा; भरतीपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी बालकांसह महिलांना काढले सुखरूप बाहेर.

दापोली: समुद्रकिनाऱ्याची अथांग गाज, थंडगार वारा आणि मऊशार वाळू… पर्यटकांसाठी कोकणचे किनारे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. पण याच निसर्गरम्य किनाऱ्यांवर जेव्हा अतिउत्साही पर्यटक स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात, तेव्हा निसर्गाचा आनंद चिंतेत बदलतो. दापोली तालुक्यातील सालदुरे खाडी परिसरात अशीच एक थरारक आणि चिंताजनक घटना नुकतीच घडली आहे. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावरील सावणे येथील घटना अजून ताजी असतानाच, पुन्हा एकदा पुणे येथील पर्यटकांची कार खाडीकिनाऱ्यावरील धोकादायक चिखलात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे.

काय घडलं नेमकं? नेहमीप्रमाणे विकेंडचा आनंद घेण्यासाठी पुणे येथील काही पर्यटक दापोलीत आले होते. निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी या पर्यटकांनी आपली कार थेट सालदुरे खाडीच्या किनारी आणली आणि चिखलात कार पळवून स्टंटबाजी करायला सुरुवात केली. पण निसर्गाच्या नियमांपुढे गाडीची गती काय चालणार? काही वेळातच ही भरधाव कार खाडीकिनाऱ्यालगत असलेल्या दलदलीत आणि चिखलात वाईट पद्धतीने रुतली. गाडीचे चाक चिखलात इतके खोल गेले की गाडी जागची हलणेही अशक्य झाले.

भरतीची वेळ आणि काळजाचा ठोका चुकवणारे ‘ते’ ६० मिनिटं! गाडी चिखलात अडकली तेव्हा त्यात महिला, पुरुष आणि लहान मुलेही होती. सर्वात मोठी भीती म्हणजे समुद्राला भरती येण्याची वेळ जवळ येत होती. जर भरतीचे पाणी खाडीत शिरले असते, तर कार पाण्याखाली जाऊन मोठी जीवितहानी झाली असती. घटनेचे गांभीर्य ओळखून सालदुरे येथील स्थानिक ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली.

स्थानिक नागरिक निवेदान शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांच्यासह अनेक तरुणांनी आणि ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावली. भरतीचे पाणी जवळ येण्यापूर्वीच त्यांनी सर्वात आधी कारमधील महिला आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सुरू झाली चिखलातून कार बाहेर काढण्याची शर्थ! सुमारे तासभर चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर, सर्वांनी एकजुटीने जोर लावून ती कार सुरक्षितपणे चिखलातून बाहेर काढली. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे आणि देवदूतासारख्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.

स्थानिक नागरिक आक्रमक: प्रशासनाचे नियम कागदावरच का? दापोली तालुक्यातील आंजर्ले, हर्णे, मुरुड आणि सालदुरे या समुद्रकिनाऱ्यांवर शासकीय वाहनबंदीचे स्पष्ट आदेश आहेत. किनाऱ्यावर वाहने नेण्यास बंदी असतानाही पर्यटक सर्रास गाड्या आत घेऊन जातात. या बेजबाबदार वर्तनामुळे आता स्थानिक नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत.

“प्रत्येक वेळी पर्यटकांच्या चुकीमुळे आम्हीच का धावून जायचे? उद्या एखादा मोठा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. समुद्रकिनाऱ्यांवर कायमस्वरूपी बॅरिकेड्स लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि अशा हुल्लडखोर पर्यटकांवर थेट फौजदारी किंवा मोठी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular