HomeChiplunकोकण रेल्वे भरतीचा अजब कारभार; भरती कोकणात, मुलाखती चक्क विशाखापट्टणमला; तीव्र विरोध

कोकण रेल्वे भरतीचा अजब कारभार; भरती कोकणात, मुलाखती चक्क विशाखापट्टणमला; तीव्र विरोध

१३२ पदांच्या भरती प्रक्रियेवरून कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती आक्रमक; शौकत मुकादम यांची मुंबई, रत्नागिरीत मुलाखती घेण्याची मागणी.

चिपळूण: कोकण रेल्वेच्या एका अजब निर्णयामुळे सध्या कोकणातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कोकण रेल्वेने १३२ रिक्त पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मात्र, या भरतीसाठीच्या मुलाखती कोकणात किंवा महाराष्ट्रात न घेता थेट आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेच्या या चक्रावून टाकणाऱ्या निर्णयाला ‘कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती’ने कडाडून विरोध केला असून स्थानिक उमेदवारांवर होणारा हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

नेमका वाद काय आहे? कोकण रेल्वेने १४ मे २०२६ रोजी १३२ जागांसाठीच्या भरतीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले होते. या परिपत्रकानुसार, पात्र उमेदवारांच्या मुलाखती ८ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. मात्र, यासाठी निश्चित केलेले केंद्र सर्वांनाच धक्का देणारे आहे. कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांशी जोडलेला असताना, मुलाखतीचे केंद्र मात्र शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ठेवण्यात आले आहे.

स्थानिक तरुणांवर आर्थिक आणि मानसिक ताण कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकण प्रांताशी संबंधित आहे. असे असताना स्थानिक मुलांना मुलाखतीसाठी थेट विशाखापट्टणमसारख्या दूरच्या ठिकाणी बोलावणे अत्यंत अयोग्य आणि गैरसोयीचे आहे. आधीच बेरोजगार असलेल्या या तरुणांना एवढ्या लांबच्या प्रवासाचा आर्थिक भार आणि मानसिक त्रास का दिला जात आहे?” भरती कोकण रेल्वेची आहे, तर मग महाराष्ट्राबाहेर मुलाखती घेण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा थेट सवालही त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.

समितीची प्रमुख मागणी काय? अन्याय निवारण समितीने रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे की, ही भरती प्रक्रिया तात्काळ थांबवून किंवा त्यात सुधारणा करून मुलाखतींचे केंद्र बदलण्यात यावे. पूर्वीप्रमाणेच मुंबई, बेलापूर, मडगाव (गोवा) आणि रत्नागिरी या पारंपरिक केंद्रांवरच या मुलाखती आयोजित कराव्यात, जेणेकरून कोकणातील गरिबातील गरीब तरुणालाही आपल्या हक्काच्या नोकरीसाठी मुलाखत देणे सहज शक्य होईल.

स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या हक्कासाठी आणि या अन्यायाविरोधात आता कोकणात तीव्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular