तालुक्यातील कुवारबाव येथील एमआयडीसीमध्ये महावितरणच्या जागेत वाळलेल्या गवताला आग लागली. मात्र, वेळेत अग्निशमन दलाचे पथक पोहोचल्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. तसेच काळबादेवी किनारी सुरूबनाला लागलेल्या आगीत झाडे जळून खाक झाली आहेत. या दोन घटना गुरुवारी (ता. ६) दुपारच्या सुमारास घडल्या. कुवारबाव एमआयडीसी येथे गवताला आग लागल्याची माहिती महावितरणचे कर्मचारी प्रशांत सावंत यांनी एमआयडीसीच्या अग्निशमन यंत्रणेला कळवली. दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये लागलेली आग वेगाने पसरत होती. महावितरणच्या कार्यालयापासून काही अंतरावर लोकवस्तीही आहे. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून एमआयडीसीच्या अग्निशमन यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गाजवळ असलेल्या काही घरांच्या दिशेने आग वेगाने पसरत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रथम तिकडे लक्ष केंद्रित केले. ती आग नियंत्रणात आल्यानंतर महावितरणच्या कार्यालयासमोरील आग शमविण्यास सुरुवात केली.
प्रचंड उष्म्यामुळे आगीचे रूपांतर वणव्यात झाले होते. यामध्ये मोठे नुकसान झालेले नाही. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. गुरुवारी सकाळी काळबादेवी येथील दत्त मंदिराच्या मागील बाजूला समुद्रकिनारी असलेल्या सुरुबनाला आग लागली. अग्निशमन यंत्रणेने आग नियंत्रणात आणली. मात्र काही वेळातच पुन्हा वाळलेल्या झाडांनी पेट घेतला. पुन्हा लागलेल्या आगीने सायंकाळी रौद्ररूप धारण केले होते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर काळबादेवीतील ग्रामस्थांनी अग्निशमन यंत्रणेशी संपर्क साधला. या आगीत सुरुची अनेक झाडे जळून भस्मसात झाली.
उन्हामुळे तीव्रता वाढली – रत्नागिरीत आज पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यामुळे दिवसभर कडाक्याचे ऊन होते. उष्म्यामुळे रत्नागिरीत लागलेल्या दोन्ही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण ठेवताना अग्रिशमन यंत्रणेपुढे आव्हान होते. याही परिस्थितीत अग्रिशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. कुवारबाव येथे कार्यालयाजवळ लोकवस्ती आहे. अग्रिशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पसरणारी आग नियंत्रणात आणली. त्यामुळे अनर्थ टळला.