उन्हाळ्याच्या दिवसात चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठीनदीच्या किनारी मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नदीत पोहण्यासाठी तसेच अन्य काम ांसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी धोका निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांमध्ये मगरींनी माणसांवर किरकोळ हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, आता अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिपळूणची ओळख तळ्यांचे शहर म्हणून असली तरी, वाशिष्ठी नदीमुळे या भागाला मगरींचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मात्र, अलीकडे नदीतील गाळ काढल्याने मगरींच्या अधिवासावर परिणाम झाला आहे. तरीही, सध्याच्या वातावरणात मगरी नदीकिनारी सहज दृष्टीस पडत आहेत. चिपळूणच्या पेठमाप भागात नदीकिनारी मगरीचा वावर काही तरुणांना दिसून आला, ज्यामुळे त्यांनी तातडीने पाण्यातून काढता पाय घेतला. मगरींच्या प्रजननाचा काळ सुरू असल्याने त्या अधिक संवेदनशील आणि आक्रमक बनतात. मादी मगर जमिनीवर अंडी घालते आणि सुमारे एक ते दीड महिना घरट्याचे रक्षण करते.
या काळात जर कोणी तिच्याजवळ गेल्यास ती हल्ला करण्याची शक्यता असते. लहान पिल्ले जन्माला आल्यावर ती स्वतः शिकार करत नाहीत, तर पाण्यात उतरून कीटक आणि लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरीला कमी प्रमाणात अन्नाची गरज असल्याने ती मोठ्या प्राण्यांची शिकार सहसा करत नाही. वन विभागाने आणि जाणकारांनी नागरिकांना खोल पाण्यात उतरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. नदीकिनारी कपडे धुताना किंवा अंघोळ करताना विशेष काळजी घेण्याचे आणि शक्यतो काठाजवळच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या जनावरांना खोल पाण्यात पाणी पिण्यासाठी घेऊन जाऊ नये. ज्या भागात मगरींचा वावर अधिक आहे, त्या भागात पाण्यात उतरणे पूर्णपणे टाळावे. लहान मुलांना नदीकिनारी एकटे सोडू नये. जनावरांना पाणी पाजायचे असल्यास काठावरील उथळ जागेचा वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट खाडीकिनारी, नाईक कंपनी पूल, मुरादपूर, शंकरवाडी, खाटीकआळी, बाजारपेठेतील पूल, शिवनदीवरील पूल, गोवळकोट रोड परिसरातील नदी, नारायण तलाव, वीरेश्वर तलाव, रामतीर्थ तलाव यांसारख्या परिसरात मगरींचा वावर अधिक असतो. वनप्रेमी अमय गोडबोले यांनी सांगितले की, मगरी सहसा माणसांवर थेट हल्ला करत नाहीत, परंतु लहान मुले त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नदीत पोहताना लहान मुलांची काळजी घेणे आणि शक्यतो मगरींच्या अधिवासाजवळ न जाणे सुरक्षित आहे.