कोयना धरणातून बाहेर पडणारे ६८ टीएमसी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरवून उर्वरित पाणी मुंबईत वळविण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे हवाई सव्हेक्षण करण्यात आले असून लवकरच त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येईल. तब्बल ३८ कोटी रुपये या सर्व्हेक्षणासाठी खर्च आला असून व्हॅसकॉम कंपनीने हे सव्र्व्हेक्षण पुर्ण केले आहे. कोयनेचे अवजल १६० कि.मी. च्या पाईपलाईनद्वारे, मुंबईला नेण्यात येणार आहे. वीजनिर्मितीनंतर कोयना धरणातील सुमारे ६८ टीएमसी पाणी चिपळूणमधील वशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाते.
वाहून जाणारे हे पाणी सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या मुंबईत जलवाहिन्यांमधून आणण्याचा प्रस्ताव आहे. हे पाणी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ शहराला देण्याचे राज्य सरकाराच्या विचाराधीन आहे. पाणी मुंबईपर्यंत आणायचे झाल्यास मुंबईतून कोकणापर्यंत जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गाप्रमाणे पाईपलाईन टाकल्यास पाईपलाईन टाकण्यासाठीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे हवाई सर्व्हेक्षण करुन पाईपलाईन जंगलातून नेण्याचा विचार सरकार करत आहे.
सकारात्मक प्रतिसाद – राज्य सरकारने नेमलेल्या समि तीने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने पाटबंधारे विभागाचे माजी सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली कोयना अवजल पाणी अभ्यासगट नेमला होता. त्याचा अहवाल समितीने २००५ ०६मध्ये सरकारला दिला. सरकारने या अहवालातील शिफारशी तत्त्वतः स्वीकारल्या होत्या.
आधी रत्नागिरी, सिंधुदुर्गला पाणी – म. दि. पेंडसे समितीने या अहवालात कोयनेच्या पाण्याचा वापर आधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी करावा. शेतीसाठी पाणी दिल्यानंतर उरलेले पाणी मुंबईला द्यावे, अशी शिफारस सरकारला केली होती. त्यानुसार कोयना धरणातून बाहेर पडणाऱ्या ६८ टीएमसी पाण्यापैकी १८ टीएमसी पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात येणार आहे. तर उर्वरित ५० टीएमसी पाणी पाईपलाईनद्वारे मुंबईला वळविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कंपनी आपला आहवाल तयार करणार आहे.
३८ कोटींचा खर्च – कोयना अवजल मुंबईला नेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हे क्षणाला तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कंपनीला सर्व्हे क्षण करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. कंपनीने दिलेल्या मुदतीपुर्वी आपले सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण केले आहे.