थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा अडचणीत आलेला असताना दोन दिवसानंतर अचानक गुरूवारी (ता. ८) पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे फळं भाजण्याची भिती व्यक्त केली आहे. काही ठिकाणी उष्णतेचा परिणाम होस असल्याचे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात आले. यंदा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर ऑक्टोबरमध्ये उन्हाचा ताप पडला. परिणामी, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंबा बागायतींमध्ये झाडांची पालवी जून झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मोहोर झाडावर दिसू लागला. या मोहोरातील उत्पादन मिळू लागले असून, फळं बाजारात दाखल झाली आहेत.
दुसऱ्या टप्यातील मोहोर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला. त्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. तिसऱ्या टप्यात आलेल्या मोहोरावर वेळीच फवारणी केल्यामुळे त्यामधून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळणार होते. त्यानंतरचा मोहोर थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे काळा पडलेला आहे. त्यामधून उत्पादन मिळणे अशक्य असल्याचे बागायतदारांचे मत आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पोषक वातावरण होते.
थंडीही चांगल्याप्रकारे पडलेली होती. पारा २९ अंशावर होता; मात्र वातावरणात बदल झाला असून, पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेला आहे. अचानक वाढ झाल्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे काही आंबा बागायतीमधील तयार झालेल्या फळांवर उन्हाचा स्ट्रोक बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर मार्चमध्ये हाती येणाऱ्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.