जिल्ह्यातील बांद्यासह दोडामार्ग तालुक्यांतील अनेक गावांना वादळाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. वादळानंतर तब्बल दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. फळपीक आणि उन्हाळी शेतीचे मोठे नुकसान झाले. कुडाळ आणि वैभववाडी तालुक्यांच्या अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे लाखो रुपयांची हानी झाली. सलग पाचव्या दिवशी पाऊस झालेल्या भागातील आंबा, काजू पिकांवरील संकट आणखी गडद झाले आहे. जिल्ह्यात आंबा, काजू हंगाम सुरू असताना एक एप्रिलपासून वादळी पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्याच दिवशी अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. देवगड तालुक्यात तर ७१ मिलिमीटर पाऊस झाला. शुक्रवारी (ता. ४) पहाटे पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर दिवसभर पाऊस नव्हता. आज सकाळपासूनच पुन्हा ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे प्रचंड उकाडा होता.
उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली होती. दुपारी तीनपासून सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांमध्ये विजांचा लखलखाट, ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दोडामार्ग तालुक्यात सायंकाळी चारच्या सुमारास वादळाने थैमान घातले. या भागाला वादळाने अर्धा तास अक्षरशः पिळवटून टाकले. या भागातील तळकट, कोलझर, दोडामार्ग, असनिये, झोळंबे, कुंब्रल, मोरगाव, आडारी, मोरगाव भागात चक्रीवादळसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अवघ्या दहा-पंधरा मिनिटांनी बांदा परिसरात वादळाचा तडाखा बसला. सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वारे सुरू झाले. काही वेळातच जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वांनीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. तब्बल दोन तास मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ग्रामीण भागात केळी, पपई, कलिंगड, भाजीपाला शेतीचे अतोनात नुकसान झाले. बांदा पोलिस ठाणे इमारतीवरील पत्रे उडून गेले.
जोरदार वाऱ्याने शहरात तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अनेकांच्या दुकानांचे व घरांचे पत्रे उडून गेले. मुसळधार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पवसाने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बांदा बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. शहरातील स्थानिक भाजी विक्रेत्यांना पावसाचा फटका बसला. गटारांची सफाई केली नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर वाहून आला होता.