गेल्या काही दिवसांमध्ये उष्मा वाढला आहे. त्यामुळे नैसर्गिक पाण्याची पातळी खालावू लागली आहे. तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागल्या आहेत. तालुक्यातील दोन गावांमधील वाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी फारसे प्रयत्न वा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे नळपाणी योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा पोहचताना दिसत आहेत. ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने श्रमदानातून गावोगावी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे; मात्र गेल्या काही दिवसांमधील वाढते तापमान पाहता यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आडवली पुजारवाडी आणि मोगरे सडेवाडी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.
तशी माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, सद्यःस्थितीमध्ये भूगर्भातील सरासरी पाण्याची पातळीही घटली नसून अद्यापही स्थिर असल्याचे चित्र आहे. लोकसहभागातून ग्रामपंचायतींनी बांधलेल्या बंधाऱ्यांमध्येही मुबलक पाणीसाठा आहे. तापमानवाढ होऊन पाण्याची पातळी घटल्यास मे महिन्यामध्ये उशिरा पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षीही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडल्यास पाणीटंचाईचा फारसा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यताही दुरापास्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
टँकरबाबात अद्याप निर्णय नाही – आडवली पुजारवाडी (नवानगर) यांनी टंचाई आराखड्यात सुचवलेल्या विहिरीतील गाळ काढणे व दुरुस्ती करणे यांचे प्रस्ताव घेऊन काम सुरू करण्यात येत आहे. मोगरे सडेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे या गावांमध्ये सद्यःस्थितीमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली.