HomeRatnagiriजयगड बंदरात अडकलेल्या 'आमिर' जहाजातून १५० टन गॅस उतरवणार

जयगड बंदरात अडकलेल्या ‘आमिर’ जहाजातून १५० टन गॅस उतरवणार

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेग; १,८०० टन साठवणुकीच्या प्रश्नावर प्रशासनाचा सुरक्षित तोडगा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरात गेल्या तीन महिन्यांपासून उभ्या असलेल्या वादग्रस्त ‘आमिर’ (Aamir) या गॅसवाहू जहाजाच्या बाबतीत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण आदेशानंतर या जहाजावरील प्रचंड गॅस साठा उतरवण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. जहाजावर तब्बल १,८०० मेट्रिक टन इतका ज्वलनशील एलपीजी (LPG) गॅस असल्याने सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने एकाच वेळी सर्व गॅस न काढता टप्प्याटप्प्याने मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात १५० टन गॅस रिकामा केला जाणार आहे.

नेमकं काय आहे आंतरराष्ट्रीय प्रकरण?

इराक येथून मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस भरून निघालेल्या ‘आमिर’ या जहाजाबाबत एक धक्कादायक कट उघडकीस आला होता. बोगस कागदपत्रांच्या आधारे आणि जहाजाच्या मूळ मालकाला अंधारात ठेवून हे जहाज परस्पर पाकिस्तानकडे वळवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाला होता. भारतीय यंत्रणांच्या वेळीच लक्षात ही बाब आल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार हे जहाज जप्त करून जयगड येथील ‘जेएसडब्ल्यू’ (JSW) पोर्टच्या जेटीवर सुरक्षिततेसाठी उभे करण्यात आले होते.

जेटीवरील अडथळा आणि उच्च न्यायालयाची दणकेबाज कारवाई

गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून हे भलेमोठे जहाज जेटीवरच उभे असल्याने जेएसडब्ल्यू पोर्टवर ये-जा करणाऱ्या इतर व्यावसायिक जहाजांच्या वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली होती. ज्वलनशील गॅसचा धोका आणि रोजच्या कामकाजात होणारा खोळंबा लक्षात घेऊन जेएसडब्ल्यू प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कडक भूमिका घेत जहाजमालकाला साडेनऊ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे किंवा जहाजावरील संपूर्ण गॅस रिकामा करून जहाज मूळ मालकाच्या स्वाधीन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

१,८०० टन साठवणुकीचे आव्हान; प्रशासनाची ‘सेफ’ स्ट्रॅटेजी

न्यायालयाच्या आदेशानंतर गॅस उतरवण्याच्या हालचालींना वेग आला खरा, मात्र १,८०० मेट्रिक टन एवढा प्रचंड गॅस एकाच वेळी सुरक्षितपणे कुठे साठवायचा, असा मोठा प्रश्न बंदर विभाग आणि जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला. हा धोका टाळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १५० टन गॅस बाहेर काढला जाईल.

सध्या जेएसडब्ल्यू आणि बंदर विभागाचे तज्ज्ञ पथक सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करत यावर काम करत आहेत. हा गॅस टप्प्याटप्प्याने रिकामा झाल्यानंतर जयगड बंदरातील वाहतुकीचा अडथळा दूर होईल आणि जेटीवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू होईल.

RELATED ARTICLES

Most Popular