रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील मुख्य आणि सदैव गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरामध्ये एक अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जाऊन गैरकृत्य करत विटंबना केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयित तरुणांना अटक केली आहे. स्थानिक नागरिकांनी वेळीच दाखवलेले प्रसंगावधान आणि पोलिसांची तत्परता यामुळे आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे साजन फर्जान शेख (वय २६), समीर शेख (वय २६) आणि करीम शेख (वय २३) अशी आहेत. हे तिघेही मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून सध्या रत्नागिरीतील कोकणनगर भागात वास्तव्यास होते.
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हे तिघे तरुण मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आले. त्यावेळी ते पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होते. पुतळ्याजवळ असलेल्या लोखंडी जिन्याचा आधार घेऊन ते वर चढले आणि महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून आक्षेपार्ह पद्धतीने स्वतःचे फोटो काढू लागले.
नागरिकांचे प्रसंगावधान; दोघांना जागीच पकडले
हा प्रकार त्या मार्गावरून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होत असल्याचे पाहताच नागरिकांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि संशयितांना जाब विचारला. नागरिकांचा रोष पाहून करीम शेख याने घटनास्थळावरून पळ काढला; मात्र नागरिकांनी साजन आणि समीर या दोघांना जागीच पकडून ठेवले. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि दोघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तिसऱ्या आरोपीलाही ठोकल्या बेड्या; परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी केली असता, पळून गेलेल्या तिसऱ्या साथीदाराचा ठावठिकाणा समजला. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी कोकणनगर येथील कामाच्या ठिकाणी छापा टाकून करीम शेख यालाही अटक केली.
या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मारुती मंदिर चौक व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
हिंदू संघटना आक्रमक; सखोल चौकशीची मागणी
या घटनेच्या तीव्र निषेधार्थ विविध हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एकत्र येत लेखी तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले आहे. हे कृत्य केवळ मद्यधुंद अवस्थेत केले गेले की यामागे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही पूर्वनियोजित कट होता, याचा पोलीस सर्व अंगांनी सखोल तपास करत आहेत.

