रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा तसेच कशेडी घाटाला उत्तम पर्याय ठरलेला कशेडी बोगद्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून ११ सप्टेंबरला या बोगद्यातून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व उत्सवानंतर परतणाऱ्या चाकरमान्याचा प्रवास सुकर होणार असून वेळेची बचत देखील होणार आहे. अवघ्या ‘९ मिनिटात बोगद्यातून थेट पोलादपूर गाठता येणार आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत कशेडी बोगदा सोमवार दि. ११ सप्टेंबरपासून हलक्या वाहनांसाठी वाहतुकीला खुला करणार असा निर्धार सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी केलेल्या पाहणीनंतर व्यक्त केला.
अत्यंत अवघड वळणाचा घाट असलेल्या कशेडी घाटातून वाहतूक म्हणजे अपघातांची भीती आणि वाया जाणारा वेळ पाहता त्याला पर्याय म्हणून कशेडी घाटातून थेट भुयारी मार्ग तयार करण्याची संकल्पना तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढे आणली आणि त्याला मूर्तस्वरूप देखील दिले. बोगद्याला मंजुरी मिळवत २०१९ साली या कामाचे भूमिपूजन रविंद्र वायकर यांच्या हस्ते झाले व कामाला सुरुवात देखील झाली. कोरोना काळात काम काही काळ रखडले होते. मात्र ठेकेदार कंपनीने पुन्हा कामाला गती दिली.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द येथून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड कशेडी दरेकरवाडीपर्यंत डोंगरातून सुमारे २ किलोमीटर अंतराचे असे दोन बोगदे खोदण्यात आले असून त्याची रुंदी २० मीटर तर उंची ६.५ मीटर इतकी आहे. तसेच दोन्ही बाजूचे जोडरस्ते समाविष्ट करता एकूण ११ की.मी चे अंतर होणार आहे. भोगाव, कातळी आणि कशेडी आशा तीन गावातून हा बोगदा गेला आहे. मुंबईकडे जाण्यासाठी एक मार्ग तर येण्यासाठी दुसरा मार्ग असे स्वतंत्र दोन बोगदे असून आता एक बोगद्यातील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
एकूण ४४१ कोटी खर्च अपेक्षित असला तरी त्यापेक्षा जास्त खर्च झाल्याची माहिती देखील पुढे येत आहे. अत्याधुनिक असे बुमर तंत्रज्ञान वापरून बोगद्याची खोदाई करण्यात आली आहे. बोगद्यामध्ये आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था तसेच हवा खेळती रहावी म्हणून वायुविजन भुयार देखील ठेवण्यात आले आहेत. तसेच एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी ६ ठिकाणी जोड बायपास ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी सहजपणे दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक केली जाऊ शकते.
तसेच अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन सुविधा ठेवण्यात आली आहे. ११ सप्टेंबरपासून बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून सूचना देखील केल्या आहेत. सध्या बोगद्यातून चारचाकी तसेच तीन चाकी आणि दुचाकी अशा वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. अवजड मोठ्या वाहनांना सध्यातरी बंदी असेल. गणेशोत्सवानंतर पुन्हा वाहतूक बंद ठेवून उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखर होऊन वेळेची बचत देखील होणार आहे