राजापूर: गाव स्वच्छ आणि सुंदर राहावे म्हणून शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, लाखो रुपयांचा निधी दिला जातो; मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या योजनांचा बोजवारा कसा उडतो, याचे विदारक चित्र राजापूर तालुक्यातील केळवली ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदानातून लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ‘ओझोन घंटागाडी’ गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात धूळखात पडून आहे. एका बाजूला सार्वजनिक स्वच्छतेचे हे महत्त्वाचे साधन वापराविना सडत असताना, दुसरीकडे गावात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने केळवली ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्वच्छतेचे साधन जागेवरच ठप्प; रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
शासकीय निधीचा योग्य विनियोग करून गावातील घरोघरचा आणि बाजारपेठेतील कचरा संकलित व्हावा, या उद्देशाने ही आधुनिक ओझोन घंटागाडी आणण्यात आली होती. मात्र, खरेदी झाल्यापासून आजतागायत या वाहनाचा कचरा उचलण्यासाठी प्रभावी वापरच करण्यात आलेला नाही. परिणामी, नियमित कचरा संकलन यंत्रणा नसल्यामुळे ग्रामस्थ तसेच स्थानिक व्यावसायिक उघड्यावर रस्त्यांच्या कडेला कचरा टाकण्यास भाग पडत आहेत. “शासनाचा लाखो रुपयांचा निधी अशा प्रकारे धूळखात ठेवण्यासाठी खर्च केला होता का?” असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
ओढ्यांमध्ये कोंबड्यांची घाण; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गावातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. परिसरातील काही कोंबडी विक्रेते व्यवसायातील शिल्लक राहिलेली घाण व अवयव थेट नजीकच्या ओढ्यांमध्ये आणून फेकत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ओढ्यांमधील पाणी दूषित होत असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे. पावसाळा आणि दमट वातावरणात या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत, नागरिकांमध्ये भीती
ओढ्यांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला पडणाऱ्या मांस-घाणीमुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर कमालीचा वाढला आहे. ही आक्रमक कुत्री रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या आणि दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून येत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
सखोल चौकशीची आणि कारवाईची मागणी
या सर्व कारभारावर संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे आक्रमक पवित्रा घेतला आहे. धूळखात पडलेली ओझोन घंटागाडी तातडीने प्रत्यक्ष कचरा संकलनासाठी सुरू करण्यात यावी, ओढ्यात कचरा व घाण फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून परिसर स्वच्छ करावा आणि भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच लाखो रुपयांची गाडी वापराविना ठेवणाऱ्या जबाबदारांची सखोल चौकशी व्हावी, असा सूरही नागरिकांमधून उमटत आहे.

