रत्नागिरी: “अवघे एक लाख रुपये भरा आणि अगदी १ टक्का व्याजदराने थेट १ कोटींचे कर्ज मिळवा!” अशा अविश्वसनीय आणि भुरळ पाडणाऱ्या ऑफरच्या जाळ्यात अडकून रत्नागिरीतील तब्बल ४० ते ४५ सामान्य नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काहींना तर थेट ४ कोटींपर्यंतचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक नुकसान झालेल्या संतप्त नागरिकांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार अर्ज दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरजिल्हा पातळीवरील एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
१ लाखाचे कमिशन उकळले अन् महिनाभर फक्त तारखा!
तक्रारदारांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका संशयित महिलेने कर्ज मंजुरीची सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे भासवून त्यांच्याकडून प्रत्येकी १ लाख रुपये ऑनलाईन स्वीकारले. सुरुवातीला गोड बोलून लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला; मात्र पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर महिना उलटून गेला तरी एकाही व्यक्तीचे कर्ज मंजूर झाले नाही. फसवणूक झाल्याचा संशय आल्याने नागरिकांनी जेव्हा विचारणा सुरू केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत दररोज नवीन तारखा देऊन बोळवण केली जात होती.
१५ कोटींचे ‘बँक मनी’ आणि गणेशगुळे फाट्यावर मध्यरात्रीचा खेळ
या गुन्हेगारी कटातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे, लोकांचा विश्वास बसावा म्हणून संशयितांनी चक्क १५ कोटी रुपयांची भलीमोठी रोकड नागरिकांना दाखवली होती. ही रक्कम गुहागर येथून आणलेले ‘बँक मनी’ असल्याचा दावा करण्यात आला होता. या व्यवहाराच्या अनुषंगाने विविध व्यक्तींच्या खात्यांवर लाखो रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे बँक स्टेटमेंट व ऑनलाईन पुरावेही तक्रारदारांनी पोलिसांसमोर मांडले आहेत.
एवढेच नव्हे, तर साधारण चार दिवसांपूर्वी गणेशगुळे फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरीत्या पैशांचे वाटप झाल्याचा खळबळजनक दावाही काही तक्रारदारांनी केला आहे.
पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी; रिक्षेतून रोकड वाहतूक?
कर्ज मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर जेव्हा नागरिकांनी आपले भरलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा संबंधित महिलेचे खरे रूप समोर आले. पैसे परत मागणाऱ्यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. “पोलिसांत गेलात किंवा १५ कोटींच्या व्यवहाराबाबत तोंड उघडले, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; तसेच बनावट धनादेश (चेक) व बनावट कागदपत्रे तयार करून तुम्हालाच खोट्या गुन्ह्यात अडकवू,” असा दम नागरिकांना भरण्यात आला.
याशिवाय, या संपूर्ण काळ्या व्यवहारात एका विशिष्ट तीनचाकी रिक्षेचा वापर केला जात असल्याची नवी माहिती समोर आली आहे. या रिक्षेतूनच लाखो आणि कोटींच्या रोकडची छुप्या पद्धतीने ने-आण केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, पोलिसांनी संबंधित रिक्षाचालक व मालकाची कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मुख्य सूत्रधार कोण? पोलिसांच्या तपासाकडे लक्ष
१ लाखाच्या मोबदल्यात १ टक्का इतक्या नगण्य व्याजदराने कोट्यवधींचे कर्ज देणारी ही कोणती समांतर यंत्रणा होती? दाखवण्यात आलेली १५ कोटींची ती रोकड नेमकी कोणाची होती? आणि सामान्य नागरिकांसह अनेक महिलांना आर्थिक खाईत लोटणाऱ्या या रॅकेटचा खरा मास्टरमाइंड कोण? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यामुळे पोलीस आता या प्रकरणाची व्याप्ती कशी उलगडतात आणि या भामट्यांना कधी बेड्या ठोकतात, याकडे संपूर्ण रत्नागिरीचे लक्ष लागले आहे.

