जाता जाता धुमाकूळ घालणाऱ्या पावसासोबत आलेल्या वादळाने रत्नागिरी तालुक्याला जोरदार फटका बललारी आहे. बुधवारी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास मेघगर्जनेसह वीजांचा लखलखाट करत आलेल्या पावसासोबत मोठे वादळ झाले आणि त्याचा तडाखा रत्नागिरीनजीकच्या करबुडे गावाला बसला. या वादळी पावसामुळे ३ मुलींसह एक प्रौढ नागरिक जखमी झाला असून वीज कोसळल्याने २ बैल ठार झाले. लाखोंच्या घरात नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पाऊस आता गेला असे वाटत असतानाच बुधवारी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास रत्नागिरी आणि परिसरात त्याचे मेघगर्जनेसह आगमन झाले. वीजांच्या कडकडाटात पाऊस कोसळू लागताच रत्नागिरीच्या बाजारपेठेत आलेले नागरिक आणि शाळांमधून परत जाणारे विद्यार्थी यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच वीजपुरवठाही खंडित झाला. जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालाचेही नुकसान झाले.
वीज कोसळली – कानठाळ्या बसवणारा आवाज करत बरसणाऱ्या पावसात अचानक कुठेतरी वीज कोसळली, त्याच्या आवाजाने रत्नागिरीकरही हादरले. रत्नागिरी शहराजवळ वीज कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. वीज कोठे कोसळली, याची चर्चा सायंकाळी उशीरापर्यंत रत्नागिरी शहरात सुरू होती.
करबुडेत वादळ – हा पाऊस कोसळत असतानाच रत्नागिरीजवळच्या करबुडे गावी हाहाकार उडाला. सायंकाळी ३.३० ते ४ वा. च्या सुमारास करबुडे गावात अचानक वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यामुळे शेतात भातपीकाची कापणी करणारे शेतकरी, भात झोडणी करणारे शेतकरी यांची तारांबळ उडाली. हे सर्व होत असताना अचानक वादळ सुरू झाले आणि पाहता पाहता गावातील १२ ते १५ घरांवरील छप्पर उडून गेले.
घरांचे मोठे नुकसान – घोंगावत आलेल्या या वादळाम ळे अनेक घरे कोसळली. त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच गावात वीज कोसळली आणि एका शेतकऱ्याचे २ बैल ठार झाले.
४ जण जखमी – करबुडे गावातील शितपवाडी, बौध्दवाडी, धनावडेवाडी, पाष्टेवाडी या वाड्यांना वादळाचा फटका बसला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छोटे मोठे नुकसान झाले आहे. घरांवरील छप्पर उडून गेले आहे. या वादळाने एकूण ४ जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये शर्वरी सुनील तांबे (वय १७), श्रध्दा किशोर तांबे (वय १७), दत्ताराम जानू नेवरेकर (वय सुमारे ४५ ते ५०) यांच्यासह आणखी एक १३ वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. शर्वरी आणि श्रध्दा तांबे यांच्यासह दत्ताराम नेवरेकर यांनी वीजेचा लोळ प्रत्यक्ष पडताना पाहिला आणि घाबरून ते खाली कोसळले त्यामुळे जखमी झाले. तर एक १३ वर्षाची मुलगी अंगावर काहीतरी कोसळल्याने जखमी झाली. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
घरांचे मोठे नुकसान – वादळी पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रभाकर केरू जाधव, मिलिंद भागुराम जाधव, शैला अशोक जाधव, प्रकाश सिताराम जाधव, प्राची बबन जाधव, दीपक गोविंद पाष्टे, सुरेश राम चंद्र पास्ट आणि गणपत पांडुरंग पाष्टे यांच्या घरांचे पत्रे आणि कौले उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तसेच, शंकर केरू जाधव आणि राकेश जाधव यांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, लखमा गोपाळ पाचकुडे यांच्या चिकन शॉपलाही वादळाचा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये सार्वजनिक संस्थांचीही मोठी हानी झाली आहे. गावातील बुद्ध विहाराला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. करबुडे हायस्कूलचेही मोठे नुकसान झाले आहे.

