लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील अद्वैत पेट्रोल पंपाजवळ १५ जुलैच्या पहाटे झालेला भीषण अपघात आजही रत्नागिरीकरांच्या अंगावर काटा आणतोय. एका क्षणाच्या हलगर्जीपणामुळे चार निष्पाप जीवांचा अंत झाला, तर एक जण मृत्यूशी झुंज देत आहे. आता या संपूर्ण प्रकरणी लांजा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, अपघाताला कारणीभूत ठरल्याबद्दल कारचालक आणि महामार्गावर निष्काळजीपणे डंपर उभा करणाऱ्या चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पहाटेचा तो काळोख आणि काळाचा घाला… १५ जुलै रोजी नेहमीप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरू होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक हुंडाई ग्रँड आय-१० कार (क्रमांक MH-01-CP-8021) लांजा परिसरात आली. या कारमधून कुरेशी कुटुंबातील सदस्य प्रवास करत होते. कारचा वेग चांगलाच होता. याच दरम्यान, लांजा येथील अद्वैत पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर एक आयशर डंपर (क्रमांक MH-05-L-3877) उभा होता. कारचालक मुस्तफा काफी याचे कारवरील नियंत्रण सुटले किंवा पहाटेच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि चालकाने डंपरला पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
अंधारातला तो डंपर ठरला मृत्यूचा सापळा! पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महामार्गावर उभा असलेल्या डंपरचा चालक महेश कुमार महतो याने आपला डंपर अत्यंत धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उभा केला होता. विशेष म्हणजे, महामार्गावर गाडी उभी करताना त्याने सुरक्षेचा कोणताही नियम पाळला नव्हता. डंपरच्या मागे कोणतीही टेल लाईट सुरू नव्हती, कोणताही रिफ्लेक्टर किंवा इशारा देणारा फलक लावला नव्हता. पहाटेच्या अंधुक प्रकाशात वेगवान कारचालकाला हा डंपर दिसणे कठीण झाले आणि हाच हलगर्जीपणा अखेर जीवघेणा ठरला. त्यामुळे कारचालकासोबतच हा डंपरचालकही अपघातास तितकाच जबाबदार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आनंदाचा प्रवास दुःखात विरला… या भीषण अपघातामध्ये कारमधील चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये यास्मीन इरफान कुरेशी (वय ५४), फिजा अनस कुरेशी (वय २७), महम्मद इरफान इस्लाम कुरेशी (वय १५) आणि कार चालवणारा तरुण मुस्तफा अल्ताफभाई काफी (वय २०, रा. जामनगर, गुजरात) यांचा समावेश आहे. तर महम्मद अनस इरफान कुरेशी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लांजा पोलिसांची कठोर कारवाई या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोद लक्ष्मण सरंगळे यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक मुस्तफा काफी (मृत) आणि डंपरचालक महेश कुमार नुनूचंद महतो (वय २६, मूळ रा. झारखंड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०६(१), २८१, २८५, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्यान्वये कडक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघाताने महामार्गावरील अवैध पार्किंग आणि अतिवेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

