लांजा (रत्नागिरी): संसाराची नवी स्वप्ने उराशी बाळगून सासरी गेलेल्या एका तरुणीचा अवघ्या आठच महिन्यांत सासरच्या छळामुळे दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील कुवे-वारीशेवाडी येथे घडली आहे. घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा ससेमिरा आणि सततचा मानसिक व शारीरिक छळ सहन न झाल्याने २७ वर्षीय नवविवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. शुभ्रा ऋषिकेश यादव असे मृत विवाहितेचे नाव असून, रुग्णालयातील महिनाभराची त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पती, सासरे, दीर आणि सासू अशा चौघांविरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच छळाला सुरुवात
शुभ्रा यांचा विवाह १७ फेब्रुवारी रोजी कुवे-वारीशेवाडी येथील ऋषिकेश प्रकाश यादव याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. मात्र, संसाराची सुरुवात गोड होत असतानाच अवघ्या काही महिन्यांत सासरच्या मंडळींनी आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. घरासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरहून मोठी रक्कम आणावी, यासाठी पती ऋषिकेश यादव (२७), सासरे प्रकाश केशव यादव (६७), दीर अनमोल प्रकाश यादव (२५) आणि सासू सुवर्णा प्रकाश यादव (५५) यांनी संगनमत करून शुभ्रा यांच्याकडे सतत तगादा लावला.
माहेरची आर्थिक परिस्थिती नसताना वारंवार पैशांची मागणी करणे, टोमणे मारणे आणि शारीरिक तसेच मानसिक त्रास देणे असा अमानुष छळ सासरच्या मंडळींकडून सुरू होता. रोजच्या या त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला शुभ्रा पूर्णपणे खचून गेल्या होत्या.
३ सप्टेंबरला गळफास, महिनाभर मृत्यूशी झुंज
सततच्या जाचाला कंटाळून अखेर ३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शुभ्रा यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने खाली उतरवून अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर गेल्या एका महिन्यापासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न होता अखेर ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने माहेरच्या मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी मृत शुभ्रा यांची बहीण तृप्ती भालचंद्र माजळकर (वय ३२, रा. गोंडेसखल रोड, लांजा) यांनी लांजा पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून पती ऋषिकेश यादव, सासरे प्रकाश यादव, दीर अनमोल यादव आणि सासू सुवर्णा यादव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८५, १०८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपींना कायदेशीर नोटीस बजावली असून, पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अवघ्या २७ व्या वर्षी एका सुशिक्षित तरुणीचा अशा प्रकारे बळी गेल्याने संपूर्ण लांजा परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

