रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून बदलीने नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होऊन श्री. सिंह यांना तीन वर्षे झाली. या काळात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक विकासकामे करून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर नेले. जिल्ह्यातील नागरिकांना न्याय व सेवा देण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांबरोबरच पीकविमा योजना, आपत्ती सौम्यीकरण, जिल्ह्यातील नद्यांमधील गाळउपशाच्या माध्यमातून पूरनियंत्रणाला प्राधान्य दिले.
‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत सुमारे एक लाख लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ देत प्रभावी उपक्रम राबवल्याने राज्यस्तरावर ते रोल मॉडेल म्हणून राबवण्यात आले. युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनामध्ये दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक वारसा म्हणून निवड झाली. एक जिल्हा, एक उत्पादनात म्हणून हापूसला प्रथम क्रमांक मिळाला, अशी अनेक भरीव कामे त्यांच्या कारकिर्दीत झाली.

