संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावच्या मुख्य बाजारपेठेतील सुनंदा मेडिकल स्टोअर्सला शनिवारी भल्या पहाटे अचानक आग लागली. पहाटेच्या सुमारास लागलेली ही आग तत्काळ कुणाच्या निदर्शनास न आल्याने या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अधिक वृत्त असे की, शनिवारी पहाटे ५.३० वा. च्या दरम्यान सर्वत्र सामसुम असताना ही आग लागली. पहाटे लागलेली आग ही तत्काळ कुणाच्याही लक्षात आली नाही. जवळपास तासाभराने ती लक्षात आली. सकाळी ६ ६.३० वा. च्या दरम्यान या दुकानाच्या बाजूने मेघी येथील रहिवासी रमेश गोरुले हे जात असताना त्यांना मेडिकल स्टोअरमधून धुराचे लोळ उसळताना दिसले. त्यांनी बाजूचे दुकानदार किशोर पाथरे यांना हाक मारून उठवले व मेडिकल स्टोअरमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आणून दिले.
या मेडिकल स्टोअरचे’ मालक जयेंद्र राजाराम चाळके यांना दूरध्वनीद्वारे याची माहिती देण्यात आली. ते देवरूख येथे राहतात. आगीची माहिती मिळताच अमर चाळके, किरण चाळके यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी त्वरित चाफवली येथून देवळे येथील सुनंदा मेडिकल स्टोअर गाठले. जयेंद्र चाळके हे देवरुख येथे राहत असल्यामुळे दुकानाची चावी त्यांच्याकडे नव्हती. ज्याला ज्याला आग लागल्याचे कळले तो प्रत्येकजण विझविण्यासाठी धावत आला होता. आगीचे स्वरूप पाहता कुलुप तोडून दुकानाचे शटर उघडण्यात आले. तोपर्यंत आगीने संपूर्ण दुकान पेटले होते. गावकऱ्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
लाखोंचे नुकसान – या आगीची माहिती देवळेचे पोलीस पाटील विजीत साळवी यांनी साखरपा पोलीस स्टेशनला दिली. तसेच ग्राम पंचायत व तलाठी कार्यालयालाही समज दिली. या आगीचा रीतसर पंचनामा संबंधित यंत्रणा करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७ ते ८ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत लागलेल्या या आगीने सुनंदा मेडिकल स्टोअरचे मालक जयेंद्र चाळके यांना मोठा धक्का बसला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही सम जलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ती लागली असावी, असा कयास वर्तविण्यात आला आहे. साखरपा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आग विझवण्यासाठी अनेक गावकरी धावत आले होते.

