पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी… या भावनेतून किल्ले रायगडावर शुक्रवारी शिवचैतन्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गराज रायगडावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेला शिवचैतन्य सोहळा म्हणजेच दीपोत्सव उत्साहात आणि भक्तिभावात दरवर्षी प्रमाणे यंदाही झाला. शिवराज्याभिषेक सेवा समिती रायगड यांच्यावतीने हा दिनोत्सव भव्य असा सोहळा दुर्गराज रायगडावर पार पडला. पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी.. या भावनेतून सदरचा सोहळा साजरा करण्यात आलेल्या या अनोख्या दीपोत्सवामुळे संपूर्ण किल्ले रायगड परिसर तेजाने उजळून निघाला. शिवराज्याभिषेक झालेल्या ३५३ वर्षा इतक्या मशाली याप्रसंगी प्रज्वलित करून हा भव्य दिव्य असा सोहळा साजरा करण्यात आला. रायगड किल्ल्याच्या प्रत्येक कड्यावर, तटांवर आणि पायऱ्यांवर शेकडो दिवे, मशालींचा प्रकाश लखलखत होता. या आल्हाददायक प्रकाशात किल्ल्याची दरारा आणि वैभव पुन्हा एकदा जिवंत झाला होता. राज्यभरातून हजारो शिवभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी शिरकाई देवी मंदिरापासून राजसदरेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम, पारंपारिक मर्दानी खेळ आणि जयजयकाराच्या घोषणांसह उत्साहात आणण्यात आली. पालखी आगमनानंतर राजसदरेवर महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. हजारो शिवभक्तांच्या घोषणांनी संपूर्ण गड दणाणून गेला. दीपोत्सवात अनेक शिवभक्त, महिलावर्ग, स्थानिक तरुण आणि रायगड परिसरातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राजाचा दीपोत्सव म्हणून ओळख मिळवणारा हा कार्यक्रम आता राज्यभरातील शिवभक्तांसाठी आकर्षण ठरत आहे. तथापि या वेळी किल्ल्यावर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अंधार निर्माण झाला होता. त्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाने पुढीलवेळी आवश्यक ती सोय करावी अशी मागणी केली. रायगडावरील हा शिवचैतन्य सोहळा म्हणजे केवळ दीपोत्सव नव्हे, तर छत्रपतींच्या तेज, पराक्रम आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा एक सजीव उत्सव ठरला.
आम्ही २०१२ पासून किल्ले रायगडावरती शिवचैतन्य सोहळा साजरा करून पहिला दिवा राजाच्याचरणी या भावनेतून किल्ले रायगडावरती वसुबारसच्या दिनी साजरा करतो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरती. दिवाळीमध्ये शासनातर्फे कोणत्याही प्रकारची दिपोत्सव किंवा रोषणाई केली जात नाही, त्यामुळे महाराष्ट्रभरातून आम्ही मावळे एकत्र येऊन या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो शासनाने यापुढे याची दखल घेऊन शासनाच्यावतीने दरवर्षी प्रत्येक क्षणाला किल्ले रायगडावरती रोषणाई तसेच उत्सव साजरे करावेत असे आवाहन शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी केले आहे.

