खेड (रत्नागिरी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि बाप्पांच्या मूर्तींची लगबग सुरू असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि गणेशमूर्तींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले असून, टेम्पोतील अनेक लाडक्या बाप्पांच्या मूर्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरणे नाक्याजवळील वारकरी मठासमोर हा अपघात घडला. पेण येथून गणेशमूर्ती घेऊन एक टेम्पो साखरप्याच्या दिशेने निघाला होता. त्याच वेळी बदलापूरहून गणपतीपुळ्याकडे निघालेली ‘वॅगनआर’ कार भरधाव वेगात होती. या कारने अचानक पुढे चाललेल्या टेम्पोला पाठीमागून अत्यंत जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता प्रचंड; कार १८० अंशात फिरली
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर कार रस्त्यावर गोल फिरून थेट मुंबईच्या दिशेने तोंड करून उभी राहिली, तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन महामार्गाच्या कडेला थांबला.
या अपघातात कारमधील रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिरके हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना कारमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
बाप्पांच्या मूर्तींचे नुकसान झाल्याने हळहळ
या दुर्घटनेत टेम्पोमध्ये असलेल्या सुबक गणेशमूर्ती फुटल्याने व त्यांचे नुकसान झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरळीत केली. हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला की इतर काही तांत्रिक बिघाडामुळे, याचा सखोल तपास खेड पोलीस करत आहेत.

