पावसाळा सुरू झाला की, कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण गोव्याची ट्रिप प्लॅन करतात. हिरवेगार डोंगर, धबधबे आणि धुके यांमुळे या दिवसांत कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे एक सुखद अनुभव असतो. परंतु, जर तुम्ही या मान्सूनमध्ये मुंबई-गोवा ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने प्रवास करायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या अतिजलद ‘मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस’च्या फेऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. आता ही ट्रेन दररोज धावणार नसून आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी आपले अधिकृत मान्सून वेळापत्रक (Monsoon Time Table) जाहीर केले असून, यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
फेऱ्या कमी करण्याचे सर्वात मोठे कारण काय?
पावसाळ्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर विशेषतः सह्याद्रीच्या घाट परिसरात प्रचंड पाऊस पडतो. मुसळधार पावसामुळे अनेकदा डोंगराची माती किंवा दरडी ट्रॅकवर येण्याचा (Landslides) धोका असतो, तसेच पावसाळी धुक्यामुळे समोरचे दिसणेही (Visibility) कठीण होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन रेल्वे प्रशासनाने या काळात गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एरवी १२० किमी प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी फक्त ७५ किमी प्रतितास वेगाने चालवली जाईल. वेग कमी झाल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढणार आहे. परिणामी, विलंबाची शक्यता टाळण्यासाठी आणि संपूर्ण मार्गाचे चोख व्यवस्थापन करण्यासाठी वंदे भारतच्या आठवड्यातील फेऱ्या ६ दिवसांवरून थेट ३ दिवसांवर आणल्या आहेत. यामुळे जून ते ऑक्टोबर दरम्यान या ट्रेनच्या जवळपास १०० हून अधिक फेऱ्या रद्द होणार आहेत.
कसे असेल ‘वंदे भारत’चे नवीन पावसाळी वेळापत्रक?
पावसाळ्यात मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी आता नेहमीपेक्षा जास्त वेळ म्हणजेच साधारण १० तास लागतील.
-
गाडी क्रमांक २२२२९ (CSMT ते मडगाव): १५ जून ते १९ ऑक्टोबर या काळात ही ट्रेन आठवड्यातून फक्त ३ दिवस – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोजी धावेल. सीएसएमटीवरून ती सकाळी ०५:२५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ०४:०० वाजता मडगावला पोहोचेल.
-
गाडी क्रमांक २२२३० (मडगाव ते CSMT): १६ जून ते २० ऑक्टोबर या काळात ही ट्रेन मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी धावेल. मडगाववरून दुपारी १२:२० वाजता सुटून रात्री १०:३० वाजता ती मुंबईला पोहोचेल.
(टीप: वंदे भारतप्रमाणेच मुंबई-गोवा ‘तेजस एक्सप्रेस’च्या फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली असून इतर महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.)
त्यामुळे कोकणात किंवा गोव्याला जाण्यापूर्वी रेल्वेचे नवीन वेळापत्रक नक्की तपासून घ्या, जेणेकरून तुमचा ऐनवेळचा खोळंबा होणार नाही!

