राज्यात मोठ्या प्रमाणात इंधन दरामध्ये वाढ झाल्याने, अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरला पसंती देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या इंधन वाढीमुळे अनेकांनी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध असल्याने, ग्राहकांना देखील खरेदी साठी बराच वाव आहे. एकतर इंधन खर्च बचत होणार आणि हवेतील प्रदूषण देखील रोखण्यासाठी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्याचे आवाहन शासनाने देखील केले आहे.
प्रदूषणमुक्त व पेट्रोलपेक्षा स्वस्त पडणार्या इलेक्ट्रीक वाहने व दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे पण आता इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांना नव्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मध्यंतरी काही दुचाकीना आग लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढले होते. परंतु, इलेक्ट्रिक स्कूटरच्या अवयवांची चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी शहरातील नाचणे येथून इलेक्ट्रीक दुचाकीची बॅटरी चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार जगन्नाथ पेटकर वय ५७, रा. नुतननगर, नाचणे रत्नागिरी. ऑरा कंपनीच्या नावाची इलेक्ट्रीक दुचाकी बॅटरी घराच्या जिन्याखाली चार्जिंगसाठी लावली होती. दुसर्या दिवशी सकाळी ते दुचाकीची बॅटरी पूर्ण चार्ज झाली का ते पाहण्यासाठी गेले असता, दुचाकीची बॅटरी आणि चार्जर दोन्ही चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी गुरूवार दि. २१ एप्रिल रोजी पेटकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चोराचा शोध घेत असून, पुढील तपास देखील करत आहेत.