डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ‘कफ सिरप’ विक्री करणाऱ्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषध विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईदरम्यान १९ लाख ६५ हजार रुपयांचा कफ सिरपचा साठा प्रतिबंधित करण्यात आला. विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील अन्य जिल्ह्यांसह रत्नागिरीतील १०, सिंधुदुर्गातील ४, रायगडमधील ११ औषध विक्रेत्यांचा समावेश असल्याची महिती एफडीएनच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये विषारी घटक असलेल्या कफ सिरपच्या सेवनाने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यात विशेष तपास मोहीम सुरू केली. कोकण विभागात घेतलेल्या २१३ तपासण्यापैकी ९८ विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री केल्याचे उघड झाले.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. या तपासात ठाणे जिल्ह्यातील ५९, पालघरमधील १४, रायगडमधील ११, रत्नागिरीतील १० आणि सिंधुदुर्गातील ४ औषध विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच कोकणातील १२५ कफ सिरपचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. या कारवाईत ठाणे जिल्ह्यातून १७लाख ७९ हजारांचा, रायगडमधून, २० हजारांचा, रत्नागिरीमधून ६१ हजारांचा आणि सिंधुदुर्गमधून एक लाख रुपयांचा कफ सिरप साठा जप्त करण्यात आला आहे. नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषर्षीवर कडक कारवाई होणार असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

