फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित केलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केली आहे. बारावीसाठी सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या दरम्यान, तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्युएफअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते सोमवार ९ फेब्रुवारीदरम्यान होईल.
दहावी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होईल. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www. mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.

